• Fri. May 2nd, 2025

राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

May 23, 2023

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
दि.२३ मे २०२३

राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२३- लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा यात सहभाग वाढावा यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे, या प्रक्रियेला राज्य शासनाकडून सर्व आवश्यक सहकार्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी आज मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरीक्त महासंचालक योगेंद्र प्रसाद खंडूरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. लष्करी शिस्त, देशप्रेम अंगी बाणविणाऱ्या एनसीसी मध्ये सहभागासाठी राज्यातील तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो. राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीचे विद्यार्थी संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. या जागा वाढल्यानंतर सध्या एनसीसीत सहभागी होणाऱ्या सव्वा लाख विद्यार्थ्यांची संख्या ६० हजाराने वाढणार आहे. या अतिरीक्त जागा वाढविण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र एनसीसीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याबाबत केंद्र शासनाकडे निधी आणि अनुषांगिक बाबींसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली.
सुरुवातीला श्री.सिंग यांनी महाराष्ट्रातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *