स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हटले आहे की, 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतील.
नोटा बदलण्यासंबंधी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी आवश्यक असेल व फॉर्मही भरावा लागेल, असे दावे सोशल मीडियावर करण्यात येत होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. या नोटा त्यानंतरही कायदेशीर राहतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

6 प्रश्नांमध्ये नोटा बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.
1. प्रश्न: 2 हजाराच्या नोटा कोठून बदलता येतील?
उत्तर: तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता.
2. प्रश्न: माझे बँकेत खाते नाही. मला नोटा बदलता येतील का?
उत्तर: होय, तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलू शकता. यासाठी त्या बँकेत तुमचे खाते असणे आवश्यक नाही. तुम्ही थेट काउंटरवर जाऊन नोटा बदलू शकता. दुसरीकडे, जर तुमचे त्या बँकेत खाते असेल, तर तुम्ही हे पैसे तुमच्या खात्यातही जमा करू शकता.
3. प्रश्न: एका वेळी किती नोटा बदलता येतील?
उत्तरः 2000 च्या नोटा एकावेळी 20,000 च्या मर्यादेपर्यंत नोटा बदलता येतील. पण तुम्ही तुमच्या खात्यात कितीही 2000 च्या नोटा जमा करू शकता.
4. प्रश्न: नोटा बदलण्यासाठी बँकेला काही शुल्क द्यावे लागेल का?
उत्तर: नाही, तुमच्याकडून मनी एक्सचेंजसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्णतः मोफत आहे. यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही बँक अधिकारी किंवा बँकिंग लोकपाल यांच्याकडे तक्रार करू शकता.
५. प्रश्नः ३० सप्टेंबरपर्यंत नोटा जमा न केल्यास काय होईल?
उत्तर: 2000 च्या नोटा व्यवहारांसाठी वापरल्या जाऊ शकतात आणि पेमेंट म्हणून देखील प्राप्त केल्या जाऊ शकतात. तथापि, RBI ने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्या जमा करण्याचा किंवा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.
६. प्रश्नः नवा नियम कोणाला लागू आहे?
उत्तर : हा निर्णय सर्वांना लागू आहे. 2000 च्या नोटा बाळगणाऱ्या सर्वच व्यक्तींना या नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन जमा कराव्या लागतील किंवा 30 सप्टेंबरपर्यंत त्या इतर नोटांमध्ये बदलून घ्याव्या लागतील.