नाशिक: भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच २००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले आहेत. नोटाबंदीसारख्या निर्णयाच्याबाबतीत धरसोड धोरण अवलंबणे, हे देशाला परवडणारे नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते
यावेळी राज ठाकरे यांना मोदी सरकारच्या काळातील नोटबंदी फसली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाहीत. नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केले होते. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितले नव्हते. हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
जयंत पाटलांच्या ईडी नोटीसवर राज ठाकरे काय म्हणाले?
यावेळी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसविषयी विचारण्यात आले. तेव्हा राज ठाकरे यांनी मला याबाबत काही माहिती नसल्याचे म्हटले. जयंत पाटील यांना कोणत्या प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे, हे मला माहिती नाही. पण सध्या देशात ईड्या काढायचे व्यवहार खूप सुरु आहेत. तुम्ही आता ज्या गोष्टी करुन ठेवता, दुसरं सरकार येतं तेव्हा ते दामदुप्पटीने याच गोष्टी तुमच्याविरोधात करतील. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले