वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांच्या ‘ लोक माझे सांगती ‘ पुस्तकातून वज्रमुठीच्या चेहऱ्याबाबत (उद्धव ठाकरे) सत्य परिस्थिती सांगितली. कशाप्रकारे मुख्यमंत्री असताना ते काम करत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले. जेव्हा आम्ही तेच सांगत होतो तेव्हा, आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवत होते. मविआतील एक पक्ष भाकरी फिरवणारा,दुसरा भाकरीचे तुकडे करणारा आणि तिसरा संपूर्ण भाकरी हिसकवणारा आहे. जनतेला भाकरी देणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजप असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरवारी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष महारष्ट्र आयोजित प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
निकालानंतर शंकेचे कारण नव्हते
फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शंका राहण्याचे कारण नव्हते. परंतु ”उद्धवजी तुमचा पोपट मेला, हे त्यांना कोणी सांगायलाच तयार नाही.” त्यांनी 8 मागण्या केल्या होत्या त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनात शंका ठेवू नका. पोपट मेला असून सध्याचे हे सरकार संविधानिक आहे.त्यामुळे हे सरकार जाणार नाही, पुढचं सरकारही आपलेच येणार आहे.
कर्नाटकातील पराभवाने काहींना उकळ्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटक मध्ये आपला पराभव झाल्यानंतर काही लोकांना उकळ्या फुटत आहेत. ज्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही ते देखील बोलत आहेत. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून आनंद साजरा करत आहेत. कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालणार तो म्हणजे मोदी पॅटर्न. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील 28 पैकी 25 जागा भाजप जिंकेल.
ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचार सोडला मात्र, एकनाथ शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. पुढची कोणतीही निवडणूक असू देत, भाजप शिवसेना युतीच जिंकणार आहे. कार्यकर्त्यांनी आगामी एक वर्ष पक्षासाठी द्यायचे आहे.पक्षाने मला काय दिले हे विचारण्यापेक्षा मी पक्षाला काय देणार याचा विचार करायचा आहे. त्यामुळे एक वर्षभर कोणी काही पद मागू नका,समर्पण आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी मी काय करायचे ते तुम्ही सांगा मी करायला तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर म्हणाल तो त्याग करायला तयार आहे. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे. एक वर्षाने त्याचे योग्य मूल्यमापन झाल्याशिवाय राहणार नाही.
असे चालणार नाही
देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर दाखल खटल्यावर भाष्य केले. ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना जामीन मिळाला नाही तर लोकशाहीची हत्या हे चालणार नाही.