• Mon. May 5th, 2025

साठलेल्या पाण्यामुळे होतो डेंग्यूचा प्रसार !

Byjantaadmin

May 16, 2023

साठलेल्या पाण्यामुळे होतो डेंग्यूचा प्रसार !

केंद्र शासनाच्या आदेशानुसार 16 मे रोजी राज्यात सर्वत्र डेंग्यू दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…

राज्यात तापच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंग्यू, चिकुनगुन्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंडयाचे रुपांतर डासात होते. त्यामुळे कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये.

सध्या उन्हाळा सुरु आहे. बऱ्याच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी साठवून ठेवले जाते. अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होवू शकते. या डासांची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. डेंग्यू विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांव्दारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न डेंग्यू दिनानिमित्त होत आहे.

आजाराची  लक्षणे : तीव्र स्वरुपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, डोळयाच्या मागे दुखणे, सांधे दुखी, उलटया होणे, अंगावर पुरळ येणे, संडास रक्तमिश्रीत होणे (पंधरा वर्षाखालील मुलांना जास्त त्रास होतो).

रोग निदान :-रक्तजल नमून्याची तपासणी

उपचार : ताप विरोधी गोळ्या, आराम. अशा स्वरुपाचा रुग्ण आढळून आल्यास तात्काळ दवाखान्यातील वेगळ्या खोलीत उपचार घ्यावेत.

रोगप्रसारक डास व त्याची उत्पत्ती  :

डासाच्या जीवनचक्रामध्ये चार अवस्था (अंडी, अळी, कोष व प्रौढ डास) असून तीन अवस्था ह्या पाण्यातील आहेत. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे शक्य होईल.

  • अंड्यापासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारपणे आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागतो.
  • डेंग्यु व चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्टाय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ

दिवसापेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाणीसाठयामध्ये होतो. उदाः हौद, माठ, रांजन, रिकामी टायर्स, नारळाच्या करवंटया, कुलरमधील पाणी ओव्हरहेड टॅक, भंगार सामान घर व घराच्या परिसरातीलसर्व पाणीसाठे.

किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना :

किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आठवड्यातून किमान एका वेळेस पाण्याचे सर्व साठे रिकामे करुन घासूनपुसून स्वच्छ कोरडे करुन पुन्हा वापरावेत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावेत, डबकी व पाण्याच्या टाक्यामध्ये डासअळी भक्षक गप्पीमासे सोडावेत. पाणी वाहते करावे, डबके बुजविणे, डासोत्पत्तीस्थाने नष्ट करणे, साठलेल्या डबक्यात नाल्यात तेल वंगन टाकावे. झोपतांना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. आवश्यकतेनुसार अबेटींग करणे, धूर फवारणी करावी.

लक्षणे आढळल्यास तातडीने रक्त तपासणी करा

ताप आल्यास तसेच उपरोक्त रोग लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपाणी करुन घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय स्तरावर डेंग्युच्या निदानाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे लक्षणे अस्लायास्त तत्काळ दवाखान्यात जावून आवश्यकतो उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर आरोग्य सेवा परिमंडळ उपसंचालक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) एस. बी. ढगे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हिडोळे एस. एस. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *