छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास नव्या पिढीने समजून घ्यावा इतिहासकार विवेक सौताडेकर यांचे प्रतिपादन
निलंगा – छत्रपती संभाजीराजे म्हणजे प्रचंड शौर्य, उत्तुंग ध्येय, आदर्शवादी राष्ट्रभक्त व सूर्यप्रकाशासारखे निर्मळ, तेजस्वी व्यक्तिमत्व होते. त्यांना सुमारे सतरा भाषा अवगत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे वंशश्रेष्ठात्वानुसार स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. आपल्या आठ वर्षाच्या राजवटीत त्यांनी १३००० लढाया केल्या. एकाच वेळी सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, डच, मुघल इत्यादी शत्रू पक्षांची निकराचा लढा दिला. स्वराज्य घडवताना शंभूराजांनी क्षणाचीही उसंती घेतली नाही. संभाजी राजे प्रचंड पराक्रमी, कर्तृत्व संपन्न, धाडसी ,विद्वान स्वाभिमानी, प्रजावत्सल, न्यायी, स्पष्टोक्ता ,राष्ट्रभक्त असताना त्यांना खलपुरुष का ठरवण्यात आले हा चिंतनाचा विषय आहे. स्त्रीलंपट, व्यसनाधीनता, भित्रा, धर्मवीर, जुलमी, अत्याचारी, अविचारी म्हणून शंभूराजांना रंगविण्यात आले. इतिहास ,साहित्य कथा,नाटक, सिनेमा, दूरदर्शन प्रसारमाध्यमातून संभाजी राजांचे चरित्रहनन का करण्यात आले? याचे मंथन नव्या पिढीने करणे आवश्यक आहे.निर्व्यसनी, प्रजाहितवादी, स्वातंत्र्यवीर, एक पत्नी, एकवचनी असताना संभाजी राजांना विकृत करून बहूजनांच्या मेंदूत घुसविण्यात आले.हे महापाप कोणी व कशासाठी केले याबाबतही चर्चा करणे महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास नव्या पिढीच्या समोर येणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन इतिहासकार विवेक सौताडेकर यांनी केले.
मराठा सेवा संघ शाखा निलंगा च्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६७ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी राजे व आजचा युवक’ या विषयावर निलंगा येथील जिजाऊ सृष्टी येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश हानेगावे हे उपस्थित असून प्रमुख अतिथी म्हणून संभाजी नवघरे, वनिता काळे,बोराडे ताई, समाधान माने,बाळासाहेब शिंगाडे,मधुकर माकणीकर, लालासाहेब देशमुख, सगरे पी एस,गुंदुरे डी बी,बरमदे डी बी,अंबादास जाधव,बरमदे डी एन,विनोद सोनवणे डॉक्टर अरविंद भातांबरे यांची उपस्थिती होती.
श्री सोताडेकर पुढे म्हणाले की संभाजी राजांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवत ‘बुधभूषण’ हा ८८३ श्लोकांचा संस्कृत ग्रंथ लिहिला.त्याचबरोबर नखशिख, नायिकाभेद,
सातशतक हे हिंदी (ब्रज) भाषेतील ग्रंथ वयाच्या १४ते १७ व्या वर्षी लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य जवळजवळ दुपटीने वाढविले. आणि शेवटी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले याची जाण नव्या पिढीने ठेवायला हवी असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि मोहन घोरपडे यांनी केले. व आभार जाधव एम एम .तर सूत्रसंचालन उत्तम शेळके यांनी केले. कार्यक्रमासाठी जाधव ए पी,कुमोद लोभे,नेलवाडे आर के,प्रमोद कदम,अमर पाटील,बाळू बिरादार,बाबळसुरे डी डी,धुमाळ किरण,आनंद जाधव, रंजना जाधव,राजश्री शिंदे,बरमदे दैवशाला, आरती जाधव यांनी
परिश्रम घेतले