• Mon. May 5th, 2025

MVA मध्ये कसं होणार जागावाटप? अजित पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

Byjantaadmin

May 15, 2023

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरातही विरोधी पक्षांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्याबरोबरच लोकसभा निवडणुकांसाठीही विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निकालांवर प्रतिक्रिया देताना आत्तापासूनच तयारी सुरू करण्याचे सूतोवाचही दिले होते. त्यानुसार रविवारी संध्याकाळी मविआची बैठकही पार पडली. या बैठकीत काय घडलं, हे माध्यमांना सांगताना आज अजित पवारांनी जागावाटप कसं होईल, यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे.

“रविवार असूनही बैठक ठरली”

“उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सगळ्यांशी संपर्क साधला गेला. मी आणि जयंत पाटील, आम्हालाही सांगितलं की जरी रविवारचा दिवस असला, तरी आपण सगळ्यांनी संध्याकाळी बैठकीसाठी यायचं आहे. त्यामुळे संजय राऊत वगैरे सगळे त्या बैठकीला होते. त्यानंतर त्यात चर्चा झाली”, असं अजित पवार म्हणाले.

“उत्साह द्विगुणित झाल्याचं दिसतंय”

“२०१४ सालापासून कालच्या कर्नाटक निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींच्या नेतृ्त्वाखाली केंद्रात दोन वेळा सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांत भाजपाची सरकारं आली. त्यामुळे साहजिकच भाजपात एक उत्साह पाहायला मिळायचा. विरोधक काही प्रमाणात निराश झाले होते. पण काल कर्नाटकाचा निकाल आला. एक्झिट पोलचेही आकडे चुकले. १०० ते ११५ पर्यंत CONGRESS जाईल असं त्यात म्हटल होतं. पण काँग्रेस १३५ पर्यंत पोहोचली. भाजपा तर एकदम ६५ पर्यंत पोहोचले. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं”, असं AJIT PAWAR म्हणाले.

“कालच्या बैठकीत मविआची पुढची वाटचाल काय असायला हवी, वज्रमूठच्या राहिलेल्या सभाही व्हायला हव्यात यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव THAKARE  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी ४८ जागांबाबतचं वाटप करावं. कोणत्या जागा कुणी लढायच्या ते ठरवावं. २८८ जागांची चर्चा करता आली तर तीही करावी, असं ठरलं. कारण काहींना असं वाटतंय की कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. त्यामुळे एकदम ऐनवेळी निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलचीही साधक-बाधक चर्चा झाली”, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

जागावाटपावरील चर्चेसाठी समिती

दरम्यान, मविआतील पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा करण्यासाठी समितीची स्थापना केली जाईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “जागावाटप समितीसाठी तिन्ही पक्षं काही नावं देतील. मग ते लोक बसून विचार करतील. दोन दोन नावं तिन्ही पक्ष देतील. मग हे ६ लोक बसून जागावाटपाची चर्चा करतील”, असं अजित पवार म्हणाले.

“फक्त तीन पक्ष नाही, पण या तीन पक्षांशी संबंधित मित्रपक्ष, भलेही ते आमदारांच्या संख्येनं लहान असतील, त्यांनाही बरोबर घ्यावं असं अनेकांनी आम्हाला म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या बाबतही चर्चा झाली”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *