MUMBAI भारत एक शांतता प्रिय देश आहे, तरी देखील आमच्या शेजारची राष्ट्र कुरापती काढत असतात. त्यांना समजेल त्या भाषेत उत्तर देण्याची धमक आपल्यामध्ये आहे. परंतु आम्ही कुणाच्या वाट्याला आपणहून जाणार नाही, पण जर कुणी आमच्या वाट्याला आले तर त्याला सोडणार देखील नाही, हे आपले धोरण असल्याचे सांगत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शत्रू राष्टांना इशारा दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह महासंमेलनात ते बोलत होते. संरक्षण साधन सामुग्री, शस्त्रास्त्रे निर्मितीत भारत आत्मनिर्भर बनत आहे.आता सैन्यासाठी लागणारी हत्यारं, दारूगोळा आपण भारतातच बनवतो, हे केवळ PM MODI यांच्यामुळेच शक्य झाल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजपूत समाजाचे प्रश्न आणि मागण्यांवर महाराष्ट्रातील राज्य सरकारने ताडीने निर्णय घेत ते सोडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील कौतुक केले.
राजनाथ सिंह म्हणाले, आपल्या शेजारी चीन, पाकिस्तान सारखी राष्ट्र आहेत. आम्ही शत्रूच्या प्रत्येक कृतीला सडेतोड प्रत्युत्तर देवू शकतो. आपण ते दिले देखील आहे. परंतु आम्ही कुणाला छेडणार नाही, पण कुणी आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार देखील नाही, हे आपले धोरण आहे. आपल्या जवानांना लागणारे बॉम्ब, टॅंक , दारूगोळा, बुलेट या वस्तू आधी आपण बाहेरच्या देशातून आयात करायचो.
परंतु पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे आता या सगळ्या शस्त्र सामुग्री आपण आता आपल्याच देशात, आपल्याच लोकांच्या हातून तयार करत आहोत. पुर्वी भारताकडे जगातील इतर राष्ट्र दुर्लक्ष करायचे, कुणी आपले म्हणणे ऐकत नव्हते. भारताला कुमकूवत समजले जात होते. मात्र आता मोदी बोलतात आणि सगळं जग ऐकतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम पंतप्रधानांनी केले.
रशिया-युक्रेनच्या युद्धात जेव्हा भारतीय नागरीक तिथे अडकले होते. तेव्हा जगातील कोणत्याही राष्ट्राला जमले नाही, ते आधी भारताने करून दाखवले. सगळ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणले, असेही राजनाथ सिंह म्हणाले. आपल्या शेजारचा पाकिस्तान देश दहशतावदाच्या माध्यमातून देश तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्यांचे मनसुबे आपण उधळून लावले आहेत. त्यांच्या भूमीत जावून त्यांना आपण धडा शिकवला आहे. या सर्जीकल स्ट्राईकनंतर भारताने जगाला संदेश दिला, बदललेल्या भारताच्या सैन्य ताकदीचा परिचय या कारवाईने झाला.
भारत शत्रूला कुठेही आणि कधीही धडा शिकवू शकतो हे अख्ख्या जगाने पाहिले, असेही राजनाथ सिंह म्हणाले. भारतात ती ताकत आहे जो भारत कुणालाही कुठंही धडा शिकवू शकतो. राजपूत समाजाबद्दल बोलतांना ते म्हणाले, राजपूत समाजाची महाराष्ट्रात एवढी मोठी ताकद आहे याची मला कल्पना नव्हती. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणखी पाचशे ते हजार वर्षांनंतरही त्यांचे महत्व कायमच राहील. महाराणा प्रताप यांच्या कार्याकाळाचा उल्लेख मुघल काळ असा न करता तो महाराणा प्रताप काळ असा करावा, असे आवाहन देखील राजनाथ सिंह यांनी केले.