• Mon. May 5th, 2025

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी धक्कादायक माहिती! T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात…

Byjantaadmin

May 14, 2023

डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे आता T20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) सामन्यापर्यंत पोहोचले आहेत. कुरुलकरांना 15 मे पर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आलेली असून या प्रकरणात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

प्रदीप कुरुलकर यांना हनी ट्रॅपमधे अडकवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधे झालेल्या टी 20 क्रिकेट सामन्याचा उपयोग करण्यात आला होता. एटीएसच्या तपासात नवीन बाबी निष्पन्न होत असून त्यात ही माहिती समोर आली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झारा दासगुप्ता या बनावट नावाने कुरुलकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. याच महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान कुरुलकर यांच्याशी बनावट खातं तयार करत संपर्क साधण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानी तरुणीने भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत कुरुलकंरांचा विश्वास संपादन केला होता.

झारा दासगुप्ता नावाने संपर्क साधणाऱ्या तरुणीने आपण लंडनमधे राहत असलो तरी भारतीय चाहते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न यावेळी केला होता. यानंतर तिने कुरुलकर यांचा विश्वास संपादन केला. अन अखेर तिने त्यांच्याकडे भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती मागण्यास सुरुवात केली होती. दरम्यान 15 मेपर्यंत कुरुलकरांना एटीएसकोठडी असून या प्रकरणात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

याआधी कुरुलकर ई-मेलमार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले होते. मेलमध्ये नेमकं काय संभाषण झालं होतं हे अद्याप उघड झालेलं नाही. तसं डॉ. प्रदीप कुरुलकर हे डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना भेटत होते. त्यांच्याकडे दोन पासपोर्ट असून त्यांनी शासकीय पासपोर्ट वापरून 5 ते 6 देशांत दौरा केल्याचंही तपासात उघड झालं आहे. हे दौरे कशासाठी केले? ते कोणाला भेटले? याचा तपास आता करण्यात येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रदीप कुरुलकर मेसेजिंग अ‍ॅपद्वारे व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलद्वारे “पाकिस्तान इंटेलिजेन्स ऑपरेटिव्ह”च्या एजंटच्या संपर्कात होते. पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन त्यांना एटीएसने अटक केली आहे. कुरुलकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून शत्रू देशाला आपल्या ताब्यातील अधिकृत गुपिते देत देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला असल्याचा आरोप एटीएसने ठेवला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *