नाशिक, 11 मे : सुप्रीम कोर्टात गेल्या अनेक महिन्यांपासून सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. अखेर आज राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाचा निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ मात्र नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ आपल्या गावात देखील नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. झिरवाळ यांचे सगळे फोन सकाळपासून बंद आहेत. आज सुप्रीम कोर्ट सत्तासंघर्षावर निकाल देणार आहे. निकालाच्या दिवशीच नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया
‘145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे, असं म्हणण्यात अर्थ नाही. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांना निर्णय देण्याचा पूर्ण अधिकार आहे. 16 आमदारांचा मुद्दा ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवतील, असं मला वाटतं. विधिमंडळातील ही बाब आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडेच हे जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही’, असं अजित पवार यांनी राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.