भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी सोईचे निर्णय घेतले जातात, अशात लहान मुलांच्या प्रवासाबाबत भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वेतून लहान मुलांचा प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होणार आहे. तसेच लहान मुलांचा प्रवास पूर्वीपेक्षा तो अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. जर तुम्हीही तुमच्या मुलांसोबत ट्रेनमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला या नव्या निर्णयाची माहिती असणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात भारतीय रेल्वेने ट्रायल म्हणून बेबी बर्थची सुविधा सुरू केली होती. रेल्वेने याच सुविधेत आता थोडा बदल केला आहे. या बदलानुसार आता रेल्वेमध्ये बेबी बर्थसाठी सीट्स नव्या डिझाइनमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. हे नवीन डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक आणि सुरक्षित असणार आहे.
दुसरा ट्रायल लवकरच होणार सुरू
भारतीय रेल्वेकडून बेबी बर्थसंदर्भातील दुसरी ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. जर ही ट्रायल यशस्वी झाली तर लवकरच सर्व ट्रेनमध्ये बेबी बर्थची सुविधा दिली जाईल. बेबी बर्थची कॉन्सेप्ट तयार करणारे नितीन देवरे यांनी सांगितले की, रेल्वे प्रवासादरम्यान आई आणि बाळाच्या बर्थवर कमी जागा असल्याने अडचणी येत होत्या. हीच समस्या लक्षात घेऊन बेबी बर्थ सुरुवात करण्यात येत आहे.
पहिल्या ट्रायलमध्ये अनेक उणिवा
२०२२ मध्ये बेबी बर्थची पहिली ट्रायल सुरू करण्यात आली, त्यानंतर अनेक त्रुटी समोर आल्या. यानंतर बेबी बर्थमधील अनेक उणिवा दूर करण्याचे काम पुन्हा करण्यात आले. या बदलांनंतर बेबी बर्थ पुन्हा तयार केले जात आहे.
बेबी बर्थची नवीन डिझाइन कशी असेल?
पूर्वी बेबी बर्थ या सामान्य सीटच्या दिशेनेच खुल्या होणाऱ्या होत्या, त्यामुळे मुलाला इजा होण्याचा किंवा सामान पडण्याचा धोका होता. पण आता या सीट्स वरून झाकलेल्या असणार आहेत. यामुळे आईला आरामात स्तनपान करता येईल आणि कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही.