• Wed. Apr 30th, 2025

अजित पवार येताच शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी; कार्यकर्ते म्हणाले, “आमचं म्हणणं आहे की…”

Byjantaadmin

May 5, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना पाहायला मिळाल्या. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आंदोलन करत आहेत. तसेच नव्या अध्यक्ष निवडीसाठी पवारांनी घोषित केलेल्या समितीने एकमताने त्यांचा राजीनामा मंजूर करावा अशी मागणी कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडे करत आहेत. याच विषयावर शुक्रवारी (५ मे) मुंबईत प्रदेश कार्यालयात ११ वाजता बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यालयात येताच आंदोलक कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा दिलेल्या पाहायला मिळाल्या.

sharad pawar on Ajit pawar

या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष नरेंद्र राणे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, “आमचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांचं एकच म्हणणं आहे की, शरद पवार यांनीच अध्यक्ष रहावं. यात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील अशा सर्वांचाच समावेश आहे. शरद पवारांनीही काल स्पष्ट केलं की, समितीच्या आजच्या बैठकीत जो निर्णय होईल त्यावर ते चर्चा करतील.”

“कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे मान्य आहेत का?”

“कार्याध्यक्ष म्हणून supriya sule मान्य आहेत का?” या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. “आमचं म्हणणं आहे की, कार्याध्यक्ष द्या, मात्र पुढील ३ वर्षे sharad  pawar राज्यसभेचे खासदार आहेत. ते तीन वर्षे शरद पवार यांनीच रहावं. हे तीन वर्षे कुणालाही कार्याध्यक्षपद द्यावं. जेणेकरून त्या नव्या कार्याध्यक्षाला देश आणि राज्यातील परिस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच कार्यकर्त्यांनाही समजून घ्यायला वाव मिळेल,” असं मत नरेंद्र राणेंनी व्यक्त केलं.

शरद पवारांचं सूचक विधान

दरम्यान, शरद पवारांनी गुरुवारी वाय. बी. सेंटरबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘तुम्हाला दोन दिवसांनी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही’, अशा आशयाचं विधान केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवार राजीनामा मागे घेणार असल्याचे सूतोवाच या विधानातून मिळाल्याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षांतर्गत कुणाला अध्यक्षपद मिळणार? याचेही आडाखे बांधले जात आहेत.

फॉर्म्युला ठरला?

दरम्यान, शरद पवारांनी राजीनामा दिल्यापासून पक्षांतर्गत रचनेच्या फॉर्म्युल्याची चर्चा होऊ लागली आहे. कार्यकर्त्यांनी राजीनाम्याला विरोध केल्यानंतर शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्याचवेळी भावी अध्यक्षाला तयार करण्याचीही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्याच आधारावर यांच्याकडे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सुप्रिया सुळेंकडे केंद्रीय नियोजनाची जबाबदारी तर अजित पवारांकडे राज्यातली राजकीय समीकरणांचे अधिकार सोपलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *