• Wed. Apr 30th, 2025

मान्सूनबाबत मोठी बातमी, पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

Byjantaadmin

May 3, 2023

दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या तयारीच्या हालचाली दिसायला सुरुवात झाली आहे. तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. आगामी 48 तासांत म्हणजे 6 मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मान्सूनबाबत मोठी बातमी, पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

मुंबई, ठाणे आणि कोकणात मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्या गुरुवारी मात्र मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शनिवारी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही परवा शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर शुक्रवारी याची तीव्रता कमी होईल, असा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तर मराठवाड्यात नांदेड, लातूर येथे ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांत जोरदार पाऊस

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव येथेही पावसाची शक्यता आहे.  विदर्भामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात पाचही दिवस यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

यावर्षी मान्सूनच्या हालचालीला एक आठवडा उशिरा

हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उकाडा वाढत असताना मे महिनाही पावसाचाच असेल अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मे महिन्यात वायव्य भारत, पश्चिम-मध्य भारताच्या अनेक भागांत या महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरवर्षी एप्रिलअखेर बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या हालचाली दिसण्यास सुरुवात होते. त्यानंतर चक्रीवादळांची निर्मिती होऊन 1 ते  5 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये तर 10 ते 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात येतो. यावर्षी मान्सूनच्या हालचालीच एक आठवडा उशिरा दिसू लागल्या आहेत.

2 मेला दुपारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतानाच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे देशभरात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रवास सुरु होईल. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. 7 मे किंवा 8 मे च्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed