मुंबई : ‘कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेल्या ९१ शिव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोजत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात तुमच्या भाजपची भोकं पडलेली टिनपाटं आम्हाला शिव्या घालत आहेत. तुमच्या राम म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हीच शिकवण दिली जाते का, असा प्रश्न मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना विचारायचा आहे. चिंतनाची जागा शिव्यांनी घेतली, तर मग तुमची संस्कारी माणसे गेली कुठे’, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वज्रमूठ सभेत भाजपला केला
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे अशोक चव्हाण,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सुभाष देसाई, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबतच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट टीका केली. ‘काल मध्यरात्री बारा वाजताच मी, आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करून आलो. पण त्याठिकाणी सरकारकडून कोणतीच तयारी करण्यात आली नव्हती. मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी अनेक महिलांनीही संघर्ष केला होता. त्या महिलांसारखी कणभरही हिम्मत मिंधे गटात नाही’, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही उद्धव यांनी लक्ष केले. ‘मुंबईतील सर्व कार्यालये बाहेर नेत आहेत. ही सगळी भांडवलदारी वृत्ती असून, या लोकांना सगळे ओरबडायचे आहे. जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडेल, त्याचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. या सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवींवर आहे. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या या वृत्तीकडे मिंधे बघत बसले आहेत’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘रस्त्यावर कुत्रे पकडणारी गाडी असते. तसेच भाजपवाले लोकांना पकडून तुरुंगात जाणार का भाजपमध्ये येणार, असे विचारत आहे’, अशी टीकाही त्यांनी केली. आगामी निवडणुकांमध्ये भांडवली वृत्तीच्या भाजपच्या अमित शहा यांना जमीन दाखविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
बुलेट ट्रेनवरून पुन्हा एकदा उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले. ‘आमचे सरकार गेल्यानंतर या सरकारने तातडीने बुलेट ट्रेनला जागा दिली. सोन्यासारखी जागा घशात घातली. किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहेत? मी पर्यावरण टिकवण्यासाठी आरे कारशेडला स्थगिती देऊन कांजूरमार्गला कारशेड उभारणार होतो. पण केंद्र सरकार न्यायालयात गेले आणि ती जागा अडवून ठेवली. मात्र तेव्हा कांजुरमार्गच्या कारशेडला विरोध करणारे आता आरेसोबत कांजुरमार्गलाही कारशेड करणार आहेत. ही जादू कशी झाली’, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांच्या दबावाखाली आहे, अशी टीका माझ्यावर केली जात होती. आता उदय सामंत हे शरद पवार यांना जाऊन भेटत आहेत. ही भेट चालते का’, असा खोचक प्रश्नही उद्धव यांनी शिंदे सरकारला विचारला.
‘भागवत मशिदीत गेलेले चालतात?’
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संघ-भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो, तर हिंदुत्व सोडले, अशी टीका केली जाते. मग भागवत मशिदीत गेलेले कसे चालतात’, असा सवाल त्यांनी केला.