मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आम्ही लवकरच सत्तेत असू असं वक्तव्य केलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता अमित ठाकरे यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मनसेला एखादे मंत्रीपद मिळू शकते, मनसे सत्तेत येऊ शकते अशी शक्यता असल्याचा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या विधानानंतर आता मनसेची लॉटरी लागणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय म्हणाले कडू?
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मनसेला एखादे मंत्रिपद मिळू शकते, मनसे सत्तेत येऊ शकते अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर प्रतिक्रिया देताना एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कदाचित 2024 नंतरच मंत्रिमंळ विस्तार होतो की काय असं वाटत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगवाला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जवळीक वाढत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी दोनदा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी देखील मनसेची शिंदे गटासोबत युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत दोन्ही पक्षाकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाहीये.