• Tue. Apr 29th, 2025

भाजप पदाधिकाऱ्याला दणका: महिला नगरसेविकेविरोधातील वक्तव्य महागात; १ कोटी रुपये मोजावे लागणार

Byjantaadmin

Apr 29, 2023

अहमदनगर : एका आंदोलनाच्या निमित्ताने श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला. चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी २०२१ मध्ये ५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चित्ते यांनी आदिक यांची बदनामी केल्याचं सिद्ध होत असल्याने एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी दिला आहे.

nagar bjp news

श्रीरामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. त्यावर्षीच्या शिवजयंतीला यावरून आंदोलन झाले होते. त्यामध्ये आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चित्ते यांनी आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चित्ते यांनी केला होता. त्यातून आपली बदनामी झाल्याचा दावा आदिक यांनी दाखल केला होता.

आदिक यांचे वकील अ‍ॅड. तुषार आदिक यांनी या खटल्याबद्दल सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात बसवण्याबाबत अंतिम मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. असं असताना शिवजयंतीच्या दिवशी ३१ मार्च २०२१ रोजी छत्रपती शिवाजी चौकात काही लोकांनी नियमबाह्य पद्धतीने पुतळा आणून ठेवला. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी हा पुतळा काढला. त्याच्याशी अनुराधा आदिक यांचा काही संबंध नव्हता. मात्र, पुतळ्याची जागा बदलणार असल्याचा त्यांच्यावर खोटा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा संघर्ष समितीने ४ एप्रिल २०२१ रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन केले. पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तसेच शहरात रिक्षा फिरवून पत्रकेही वाटण्यात आली होती. यावेळी चित्ते यांनी प्रसार माध्यामांना मुलाखत देताना आदिक यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. मात्र, अशी कोणतीही भूमिका आदिक यांनी घेतली नव्हती. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडून त्यांची बदनामी करण्यात आली, अशी भावना झाल्याने चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी ५ कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed