• Tue. Apr 29th, 2025

“सरकारने जनतेची डोकी फोडून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा…”

Byjantaadmin

Apr 29, 2023

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध असताना भाजपाप्रणित शिंदे सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा आम्ही सरकारला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले नाना पटोले?

राज्यातील शिंदे सरकार बारसू प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती करत आहे. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आजही पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर करण्यात आला. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू रिफायनरी प्रकल्पाचा निर्णय सरकारने घेऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. सरकार जर पोलीसांच्या बळावर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांवर अन्याय, अत्याचार करणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात ज्या भागात बारसू रिफायनरीचा प्रकल्प प्रस्थावित आहे. तेथील शेकडो एकर जमीन परप्रांतीय व सरकारच्या जवळच्या लोकांना सरकारने कमी दरात मिळवून दिली आहे आणि आता तीच जमीन मनमानी दराने विकून पैसा कमवण्याचा उद्योग सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारने काही लोकांच्या हितासाठी व दिल्लीच्या दबावाखाली निर्णय घेण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही बारसू येथे जाऊन तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली आहेत, तसेच समर्थक विरोधक, सर्व बाजूच्या लोकांशी सुद्धा चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेतली आहेत. सरकार स्थानिकांशी, प्रकल्पाला विरोध असणाऱ्यांशी चर्चा का करत नाही? चर्चेपासून सरकार पळ का काढत आहे? असा प्रश्नही त्यांनी शिंदे सरकारला विचारला. तसेच सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढावा. आंदोलकांना संयमाने हाताळावं, दुर्दैवाने काही अघटीत घडले तर सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed