• Tue. Apr 29th, 2025

आम्ही इतकेही लायक नाही?, क्रिकेटपटूंचं मौन पाहता विनेश फोगाटच्या भावनांचा बांध फुटला

Byjantaadmin

Apr 28, 2023

देशाच्या क्रीडाजगतामध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे आयपीएल (IPL 2023)ची धूम सुरु असतानाच दुसरीकडे कुस्तीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळातील धक्कादायक प्रकार नजरा वळवत आहे. सध्याच्या घडीला भारतीय कुस्ती महासंघ अर्थात डब्ल्यूएफआय  (WFI) च्या अध्यक्षपदी असणाऱ्या बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईची मागणी करत देशातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करताना दिसत आहेत.

जंतर-मंतर येथे आंदोलनास बसलेल्या या कुस्तीपटूंना काही राजकीय नेतेमंडळींनीही पाठिंबा दिला आहे. किंबहुना देशातील नागरिक आणि कुस्ती खेळाप्रती निष्ठा असणाऱ्या चाहत्यांनीही या खेळाडूंना साथ दिली आहे. पण, या साऱ्या प्रकरणापासून काही मंडळी मात्र मैलो दूर आहेत. ही मंडळी म्हणजे क्रिकेट खेळाडू.

देशातील क्रिकेटपटूंनी या मुद्द्यावर व्यक्त होण्याची तसदीही न घेतल्याचं पाहून कुस्तीपटू विनेश फोगाटनं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेटपटू आणि काही दिग्गज खेळाडूंची या प्रकरणातील भूमिका पाहता विनेशनं काही बोचरे प्रश्नही उपस्थित केले.

यंत्रणेला घाबरलात का? 

खेळाडूंचं मौन पाहता संतप्त स्वरात ‘सारा देश क्रिकेटची पूजा करतो, पण या प्रकरणावर आतापर्यंत एकाही खेळाडूनं मौन सोडलेलं नाही’, असं विनेशनं म्हटलं. ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’चा संदर्भ देत देशातील अनेक खेळाडूंनी, क्रिकेटपटूंनी अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ला पाठिंबा दिला होता. आम्ही इतकेही लायक नाही का? असा बोचरा सवाल तिनं केला.

कुस्तीपटू एखादी स्पर्धा जिंकतात तेव्हा ही मंडळी शुभेच्छा देतात, ट्विटही करतात, मग आता काय झालं? ते यंत्रणेला घाबरतात की इथंही पाणी मुरतंय? अशा शब्दांत तीनं आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याचवेळी विनेशला भावना दाटून आल्या.

खेळाडूंना आर्थिक नुकसानाची भीती? 

Open Letter आणि Video पोस्ट करत खेळाडूंना विनंती करुनही त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. असं म्हणत खेळाडूंना नेमकी कशाची भीती वाटते याची आपल्याला कल्पना नाही. पण, आपण काहीही वक्यव्य केल्यास ब्रँड आणि स्पॉन्सरशिप व्यवहारांवर याचा परिणाम होऊ शकतो याचीच चिंता त्यांना सतावत असेल असा तर्कही तिनं लावला. थोडक्यात विनेशनं खेळाडूंच्या आर्थिक नुकसानाकडे यावेळी लक्ष वेधलं.

कुस्तीपटू विनेश फोगाटच्या म्हणण्यानुसार महिला कुस्तीपटूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. किंबहुना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी अनेक महिला खेळाडूंचं शोषण केलं आहे. फेडरेशनकडून खेळाडूवर कधीही बंदी लावली जाते, जेणेकरून त्यांना खेळताच येणार नाही. त्यामुळं आता अध्यक्षांविरोधातच कुस्तीपटूंनी आंदोलनाची हाक दिली. माध्यमांशी संवाद साधताना कोणत्याही खेळाडूला काहीही झालं, तर त्याची जबाबदारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांची असे असंही ती म्हणाली. तिला या आंदोलनात साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि अशा अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी साथ दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed