मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशसमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
असा असेल फडणवीसांचा मॉरिशस दौरा
देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ते मॉरिशसमधील विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच काही सामंजस्य करारही करण्यात येणार आहे.
याशिवाय devendra fadnvis हे मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेटही घेतील. त्यानंतर सायंकाळी मॉरिशसमधील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होतील. या कार्यक्रमानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होईल.
“हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण”
दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा chatrapati shivaji maharaj यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार आहे. या पुतळ्याचं लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.