मविआ सरकराने मंजूर केलेल्या कामांचा निधी रद्द किंवा स्थगित करण्याचा धडाका शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. यावरून अजित पवार यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
अजित पवार म्हणाले, सरकार येत असतात, जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. तसेच, भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवतील. त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल, असा इशाराही पवार यांनी सरकारला दिला आहे.
नेते न्यायालयात
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मविआ सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडील जिल्ह्यांचाच अधिक समावेश आहे. याविरोधात काही नेत्यांनी न्यायालयात दाद मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
राज्यात सत्तेत येताच शिंदे-फडणवीस सरकारने बारामतीसाठी मंजूर केलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती दिली. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील 50 कोटींच्या विकासकामांनाही स्थगिती देण्यात आली. याविरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना विकासकामांना स्थगिती न देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही विकासकामांना स्थगिती देण्यात येत असल्याने अजित पवार आक्रमक झाले आहेत.
प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते
पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी लिहिलेल्या संविधानाचे, घटनेचे सर्वांनी पालन केले पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. न्यायासाठी प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते. आम्हीही सरकार चालवले आहे. त्यावेळी छोट्या-छोट्या गोष्टीसाठी कोणालाही न्यायालयात जावे लागले नाही.
निवडणुकीत धडा मिळेल
अजित पवार म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पालिकेत तृतीय श्रेणीतील कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे प्रकरण आयुक्तांकपर्यंत जाण्याची गरजच नव्हती. लोक हे सर्व पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही शिवसैनिकांनी कुणाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला आणि कुठे खुर्च्या रिकाम्या होत होत्या, हे सर्वांनी पाहिले. लोकांना असे राजकारण आवडत नाही. निवडणुकीत याचा धडा मिळेल, अशी टीका अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.