• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्ह्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत  

Byjantaadmin

Apr 25, 2023

लातूर जिल्ह्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे हवामान विभागाचे संकेत

 

*• नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

 

लातूर,दि.25(जिमाका):- जिल्ह्यात 25 व 27 एप्रिल 2023 या कालावधीत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. या कालावधीत विजा कोसळण्याची शक्यता असल्याने सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विजांचा कडकडाट सुरु असताना घराबाहेर जाणे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करु नयेत. या कालावधीमध्ये विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ अथवा नदीजवळ जावू नये, आपल्या मुलांना जलसाठे, नदीवर पोहायला पाठवू नये. शाळा, माविद्यालायाच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे.

पुलावरून अथवा नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावीत. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी आपले मुख्यालय सोडू नये, असे लातूरचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *