जळगाव, : मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अजित पवार अस्वस्थ असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील 40 आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याचे बोलले जात होते. अगदी विरोधकांकडूनही तशाच प्रकारचे संकेत दिले जात होते. अशात आपल्याबद्दल होत असलेल्या चर्चा वावड्याच असल्याचे स्पष्टीकरण स्वत: अजित पवार यांनी दिले आहे. त्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. मात्र, असं असताना जळगावमध्ये लागलेलं एक बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. भाजप नेत्याच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो झळकला आहे.
धरणगाव बाजार समितीत शिवसेना-भाजप सोबत राष्ट्रवादी गट?
धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप सोबत संजय पवारांचा राष्ट्रवादी गट मैदानात उतरला आहे. शिवसेना,भाजप व संजय पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या सहकार पॅनलच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे अजित पवारांची राज्यभरात चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी दूध संघ व जिल्हा बँकेनंतर बाजार समिती निवडणुकीतही भाजपा शिवसेनेसोबत युती केली आहे. संजय पवारांच्या राष्ट्रवादीची गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली असून निवडणुकीत महाविकास आघाडी गटाची चिंता वाढली आहे.