• Wed. May 7th, 2025

खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले “उगाच …”

Byjantaadmin

Apr 20, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी करोना काळातही अशा अनेक घडल्याचं सांगत एकाप्रकारे राज्य सरकारची पाठराखणच केली आहे.

राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. या भेटीत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक विषय मांडले. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या विषयांची यादी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी खारघऱ दुर्घटनेवरही भाष्य केलं.

उद्धव ठाकरे यांनी खारघर दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, “करोनाच्या काळातही हलगर्जीपणा झाल्याच्या अनेक गोष्टी झाल्या. आजही त्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करु शकतो. त्यामुळे त्याचं राजकारण करता कामा नये”.

“खरं तर कार्यक्रमासाठी सकाळची वेळ ठेवण्याची गरज नव्हती. मी त्यादिवशीही म्हटलं की, धर्माधिकारी आणि इतरांनी राजभवनात सत्कार करण्यास सांगायला हवं होतं. तिथे सत्कार झाला असता तर गर्दी झाली नसती. लोकांना इतर माध्यमातूनही पुरस्कार मिळाल्याचं कळालं असतं. तो अपघात आहे आणि त्याचं राजकारण करता कामा नये,” असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत?

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या (Appasaheb Dharmadhikari) कार्यक्रमाला लाखो लोकं उपस्थित राहातात. कारण अप्पासाहेब धर्माधिकारींवर जीवपेक्षा जास्त प्रेम करणारी लोकं आहेत, पण ती लोकं केवळ आपले मतदार व्हावेत यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

या कार्यक्रमाचं नियोजनही अगदी वाईट पद्धतीने करण्यात आलं होतं. ज्यांना तुम्ही मतदार बनवू इच्छित होतात, त्यांचा तुम्ही बळी घेतला. वापरा आणि फेकून द्या हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. भाजपाला मतांचं राजकारण करायचं होतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर कोणत्या विषयांवर चर्चा केली याची माहिती दिली. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास, सिडको लॉटरी, नाशिक मध्यवर्ती बँक, जिल्हाधिकारी जमिनीवरील घरं आणि जीर्ण इमारती, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, मराठी शाळा अशा विषयांवर मुख्यंत्र्यांशी चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मराठी विषय शाळेतून बंद होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री, अधिकाऱ्यांनाच हे माहिती नव्हतं. जीआरसंबंधी त्यांना काही कल्पना नव्हती असा खुलासा राज ठाकरेंनी यावेळी केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *