बारामती: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच मौन सोडले. ते बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, जी काही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. मी तुम्हाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरते सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येक सदस्य एका विचाराने चालत आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मी थोड्यावेळात देहू येथे जाणार आहे. तेथून रात्री मुंबईला रवाना होईन. मी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली ही बातमी खोटी आहे. अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या भागातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. या निवडणुकीची जबाबदारी या दोघांवरच आहे, बाकी कोणावरही नाही. मीदेखील माझे ठरलेले दौरे करत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. यानंतरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार फुटून अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चेविषयी शरद पवार यांना विचारणा केली. त्यावर ‘मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही’, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि मी असे आम्ही एकत्रित भेटलो होतो. त्यासंदर्भात वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे आणि मला भेटण्यासाठी मुंबईला येणार होते. देशपातळीवर विरोधकांची बैठक व्हावी आणि काही कार्यक्रम तयार करावा याची चर्चा करण्यासाठी तसेच या बैठकीचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. माझी खात्री आहे की श्री. ठाकरे आणि राज्यातील आम्ही सर्वजण राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहू. यासंदर्भात असलेल्या सामूहिक कार्यक्रमात आम्ही सर्व सहभागी असू, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.