रयागराजः माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलणाऱ्या या दोघांवर पोलिसांच्यादेखतच हल्ला झाल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. विविधे गुन्हे दाखल असलेल्या अतीक अहमदने त्याच्या हत्येची भविष्यवाणी १९ वर्षांपूर्वीच केली होती. २००४च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अतीकने मृत्यूसंदर्भात मोठं भाष्य केलं होतं.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अतिक उत्तर प्रदेशातून संसदेत निवडून गेला होता. त्याआधी पाच वेळा तो अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून गेला होता. उत्तर प्रदेशात ‘गँगस्टर अॅक्ट’अंतर्गत पहिलाच गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता. त्याच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे ७० गुन्हे दाखल होते. २००४मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रसारमाध्यम्यांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना त्यांने स्वतःच्याच मृत्यूविषयी भविष्यवाणी केली होती.
अतिक अहमद २००४मध्ये फुलपूर मतदारसंघातून लोकसभेसाठी उभा राहिला होता. तो जिंकूनही आला होता. निवडणुकीच्या काळात स्थानिक पत्रकारांशी बोलताना त्याने आपल्या मनातील भिती त्यांना बोलून दाखवली होती. एक तर पोलिस माझा एन्काउंटर करतील किंवा आपल्याच बिरादारीतील एखादा माथेफिरु माझी हत्या करेल, असं भाकित अतिकने केले होते
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची व त्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांची २४ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्येच्या आरोपाखाली समाजवादी पक्षाचा माजी आमदार अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, मुलगा असद व साथीदार गुलाम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. असद व गुलामचा चकमकीत मृत्यू झाला.
अतिकवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नेमके काय झाले, कसे झाले, हल्लेखोर कोण आहेत, याची शहानिशा करीत आहे. यावर तातडीने काही बोलणे उचित ठरणार नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.