सध्या कार्नाटक विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी चढाओढ निर्माण झालेली दिसत आहे. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, २०१८ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसने बहुमत सिद्ध करून प्रथम सरकार स्थापन केले होते. त्यानंतर सरकारमधील १७ आमदार फुटून भाजपात दाखल झाले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन केली. त्या उमेदवारांपैकी १४ जणांना आता भाजपने कोणताही विचार न करता उमेदवारी दिली आहे.
२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी २२४ पैकी भाजप (BJP) १०४ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला बोलावण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस आणि जेडी(एस) या पक्षांनी एकत्र येत (काँग्रेस ७६, जेडीएस ३७ आणि तीन अपक्ष असे ११६ आमदार) सत्ता स्थापन केली. त्यानंतर एका वर्षातच २०१९ मध्ये १७ आमदारांनी राजिनामा दिल्याने काँग्रेस-जेडी(एस) सरकार पडले. राजिनामा दिल्यानंतर ते आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते.
यानंतर संबंधित जागांवर टप्प्याटप्प्याने पोटनिवडणुका झाल्या. त्यावेळी भाजपने १७ पैकी १५ जणांना उमेदवारी दिली. त्यापैकी १२ पुन्हा भाजपचे आमदार म्हणून परतले. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या दोन याद्यांमध्ये त्या १७ पैकी १४ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यातील एका आमदाराच्या मुलाला पक्षाने तिकीट दिले आहे. तिकीट न मिळालेल्या तीन नेत्यांमध्ये रोशन बेग, आर. शंकर आणि एच. विश्वनाथ यांचा समावेश आहे.
भाजपने कागवाडमधून श्रीमंत पाटील, अथणी मतदारसंघातून महेश कुमथल्ली, हिरेकेरूर मतदारसंघातून बी. सी. पाटील, येल्लापूरमधून शिवराम हेब्बर, यशवंतपूरमधून एस. टी. सोमशेखर, केआरपुरा मतदारसंघातून ब्यरथी बसवराज, महालक्ष्मी लेयूट मतदारसंघातून सी. के. गोपालिया, आरआर नगरमधून सी. एन. मुनिरत्ना, गोकाक मतदारसंघातून रमेश जारकीहोळी, चिक्कबल्लापूर मतदारसंघातून डॉ. के. सुधाकर, केआर पेट जागेवरून के. सी. नारायण गौडा, होसाकोटमधून एम.टी.बी. नागराज आणि विजयनगर मतदारसंघातून आनंद सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बेल्लारी जिल्ह्यातील विजयनगर मतदारसंघातून भाजपने आमदार आनंद सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ यांना उमेदवारी दिली आहे. आनंद सिंह हे चार वेळा आमदार राहिले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. व्यवसायातही त्यांचे मोठे साम्राज्य असून ते खाणकामाच्या व्यवसायात आहेत. २०१२ च्या नोंदीनुसार त्यांच्यावर बेकायदा उत्खननाचे १५ गुन्हेही दाखल आहेत. भाजपने एमटीबी नागराज यांना होसाकोटमधून तिकीट दिले आहे. मात्र २०१९ च्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्याला न जुमानता भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे.