• Sun. May 4th, 2025

आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर

Byjantaadmin

Apr 16, 2023
आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर
• 21 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे होणार वितरण
लातूर,  (जिमाका) : आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत आरोग्यदायी भारत निर्माण करणे या श्रेणीमध्ये लातूर जिल्ह्याला सन 2022 साठीचा प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम, विविध आरोग्य सेवा आदी बाबींची दखल घेवून या पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवडक करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र दिनांक 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना प्राप्त झाले असून नागरी सेवा दिनी, 21 एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमार्फत विविध सेवा दिल्या जातात. आरोग्यदायी जीवनशैलीच्या मार्गदर्शनापासून ते विविध आजारांचे निदान, उपचार, संदर्भ सेवा इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व सेवांची व्याप्ती आणि गुणवत्तेच्या निकषावर लातूर जिल्ह्याची प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  पुरस्कारासाठी निवड करताना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादरीकरण, लाभार्थ्यांच्या सेवेविषयीच्या प्रतिक्रिया, दिल्ली येथे प्रत्यक्ष सादरीकरण यासह वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देवून आरोग्यवर्धिनी केंद्रांमधून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची खात्री करून घेतली.
लातूर जिल्ह्यात 233 आरोग्यवर्धिनी केंद्रांमधून आरोग्य सेवा सातत्याने दिल्या जात आहेत. यामध्ये गरोदर माता बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपत्कालीन आरोग्य सेवा, कान, नाक, घसा विषयक,  मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे.
लातूर जिल्ह्यात आरोग्यवर्धीनींच्या सेवा बळकट करण्यासाठी प्रशासनातर्फे निधीची उपलब्धता करून देणे, औषधांचा पुरवठा, अद्ययावत रुग्णवाहिका यासारख्या उपाययोजना, तसेच कर्करोग निदानासाठीचे ‘संजीवनी अभियान’, मातामृत्यू रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेला जीवनरेखा कक्ष, लोकांच्या सोयीसाठी गावोगावी घेतलेली आरोग्य शिबिरे आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांची नोंद पुरस्कारसाठी निवड करताना घेण्यात आली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामूदायिक आरोग्य अधिकारी, सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल यानिमित्ताने घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य तसेच सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उकृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार मिळाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच व्ही. वडगावे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *