• Sat. May 3rd, 2025

लातुरात 18 हजार वह्या, 20 कलाकार, 3 दिवस; 11 हजार चौरस फूटावर साकारली बाबासाहेबांची कलाकृती

Byjantaadmin

Apr 13, 2023

लातुरात 18 हजार वह्या, 20 कलाकार, 3 दिवस; 11 हजार चौरस फूटावर साकारली बाबासाहेबांची कलाकृती

लातूर : लातूर शहरातल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर पार्कवर बाबासाहेबांचे भव्यदिव्य चित्र नोटबुक्स म्हणजे, वह्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. ही कलाकृती 11 हजार चौरस फूट जागेवर 18 हजार वह्या आणि 20 कलाकारांनी 3 दिवसांत साकारली आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर वह्यांनी उभारण्यात आलेली ही देशातील पहिलीच चित्राकृती आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. 11, 12 आणि 13 एप्रिल रोजी हे चित्र लातूरकरांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या कलाकृतीचे उद्घाटन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पाटील कव्हेकर, शंकर शृंगारे, रागिणी यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांना अभूतपूर्व पद्धतीने अभिवादन करण्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून हे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांनी या चित्राची विक्रमी नोंद झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
वह्यांच्या माध्यमातून मोझेक पद्धतीने साकारण्यात आलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील हे पहिले चित्र आहे. 11 हजार चौरस फूट जागेवर साकारलेली ही कलाकृती पाहण्यासाठी किंवा चित्रासोबत सेल्फी घेता यावा, यासाठी मोठा उंच रॅम्प याठिकाणी उभारण्यात आला आहे. एका वेळी दहा लोक सेल्फी घेऊ शकतील असा हा रॅम्प आहे. मंगळवारपासून नागरिकांसाठी हे चित्र खुले करण्यात आले आहे. तर आज आणि उद्या हे चित्र नागरिकांसाठी खुले असणार आहे. 13 एप्रिल रोजी मध्यरात्री तोफांची सलामी देऊन हे चित्र काढण्यात येईल. या चित्राकृतीसाठी वापरण्यात आलेल्या वह्या या लातूर लोकसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या गरजू मुलांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या चित्राला चारही बाजूने कंपाउंड करून सुरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय नागरिकांना हे चित्र स्पष्ट दिसावे यासाठी एलईडी वॉल देखील लावण्यात आले आहे. दिवसा सूर्यप्रकाशात हे चित्र वेगळे दिसते आहे तर संध्याकाळी लाईट्सच्या इफेक्टमध्ये हे चित्र आणखीनच नजरेत भरते.
दरम्यान, गेल्या वर्षी खासदार सुधाकर शृंगारे यांनी 72 फूट उंचीची डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती उभारली होती. हा उपक्रम देखील आगळा-वेगळा ठरला होता. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री सेवालाल महाराज जयंती, रंगपंचमी, रामनवमी, असे अनेक उत्सव नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविले गेले आहेत. हे चित्र पूर्ण करण्यासाठी आयोजकांच्या वतीने स्टारडस्ट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत. या चित्राकृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *