• Thu. May 1st, 2025

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार

Byjantaadmin

Apr 11, 2023

नाशिक(जिमाका वृत्तसेवा) : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आरोग्य यंत्रणेकडून माहिती जाणून घेऊन त्याबाबत आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड-19, जलयुक्त शिवार अभियान, गोदावरी प्रदूषण नियंत्रण व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान व पंचनामे याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. याबैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्यचकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत पवार, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या अनुषंगाने बेडस् व ऑक्सिजनचा साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टेस्टींग लसीकरण वाढविण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे जिल्ह्यात हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर्स सुरू करण्यात येऊन त्या हेल्थ सेंटर्सचे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे ब्रँडिंग होण्यासाठी यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. या सेंटर्ससाठी  उपलब्ध करून देण्यात आलेला निधी सोयीसुविधांच्या अनुषंगाने लवकरात लवकर खर्च करण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पावार यांनी दिल्या आहेत.

जलयुक्त शिवार अभियान राबवत असतांना त्याअंतर्गत पाणलोट क्षेत्राचा विकास होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील 231 गावांची जलयुक्त शिवर अभियान 2.0 अंतर्गत निवड करण्यात आली आहे. या अभियानांतंर्गत जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा,  प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (PMKSY)(एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, आदर्श गाव व इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पूर्ण झालेली तसेच कार्यान्वीत असलेली गावे वगळून उर्वरित गावांपैकी काही गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2.0 अंतर्गत गावकऱ्यांचा सहभागाने कामांचे नियोजन करण्यात यावे, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयआयटी पवई यांच्या मदतीने उपाययोजना करण्याचे नियोजन करत आहे. त्याचप्रमाणे नदी प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येऊन दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे सांडपाणी नदीत मिसळते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच प्लास्टिक बंदीबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. जेणेकरून नदी  प्रदूषणामुळे येणाऱ्या पिढ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन संबंधित विभागांनी नदी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.

मागील वर्षभरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तेथे प्रत्यक्ष भेट देऊन शासकीय रुग्णालयामध्ये असलेली ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले नवीन अत्याधुनिक आयसीयू बेडस् तसेच विविध प्रकारची यंत्रसामुग्री, प्रयोगशाळा याबाबत माहिती जाणून घेतली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. गिते यांनी सादरीकरणाद्वारे संबंधित विषयांची माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *