बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने उरलीसुरली शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मैतासाठीच या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया येथील एका शेतकऱ्याने दिली.
या अवकाळी पावसामुळे फळबागासह पालेभाज्या त्यात टोमॅटो, पालक, कांदा, कैऱ्या सोबत ऊस देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. या रात्रीच्या अघोरी पावसाने शेतकऱ्याला खरंच आम्ही वाचतो की नाही असं देखील वाटू लागलं होते. मात्र फक्त नुकसान आणि जीवित हानीवर रात्रीचा पाऊस थांबला.
या पावसात आष्टी असेल पाटोदा केज त्यासोबत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या गारपिटीने हाहाकार माजला. काही तासांसाठी बीड जिल्ह्यातील अनेक रस्ते आपण हिमालयात आलोत की काय असा देखील प्रकार या अतिवृष्टीने पाहायला मिळाला. आता या शेतकऱ्यांना पंचनामे लवकरात लवकर करणे देखील गरजेचे आहे. रात्रीचा प्रसंग सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. हे नुकसान कसं भरून निघणार या शेतकऱ्यांना सरकार कसा न्याय देणार, हेदेखील आज पाहणे गरजेचे आहे.
धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान
काल सायंकाळी झालेल्या गारपिटीत धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. महाळंगी शिवारातील तब्बल ४० एकर द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला खास हिरावुन घेतला गेला आहे. काल झालेल्या अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे.