भाजीपाल्याचा सौदा रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू – युवा सेनेचा इशारा
निलंगा: शहरातील नगरपरिषदेच्या मैदानावर भाजीपाल्याचा सौदा रात्री दोन ऐवजी सकाळी सहा वाजता करावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने निलंगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोना काळामध्ये भाजीमंडईतील भाजीपाल्याचा सौदा हा रात्री दोनच्या सुमारास व्यापारी व शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे चालू करण्यात आला होता. पण आता कोरोनाचा काळ संपला असून दिवसभर शेतकऱ्यांना शेतातून भाजीपाला काढणे व रात्रीच्या सुमारास दोन वाजता भाजीपाला घेऊन खेडेपाड्यातून लोक सौद्यासाठी बाजारात येतात. रात्री अपरात्री साप,डुक्कर,कुत्रे, हरिण ई प्राणी यांचा सामना करून शेतकऱ्यांना बाजारात यावे लागते. त्यासाठी मुख्याधिकारी यांनी रात्रीचा भाजीपाल्याचा सौदा हा सकाळी सहा वाजता सुरू करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिवसा आपला भाजीपाला विकता येईल अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वंजारवाडे, रवी नगरसोगे, आयुब शेख, सतीश रुपनर, उद्धव जाधव इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.