ठाणे, : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ठाण्यात जोरदार राडा झाला आहे. ठाण्यात शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रोशनी शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ठाण्यातील मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आहे. ठाण्यात रोशनी शिंदेंना मारहाण करण्यात आली. ठाण्यात महिला गुंडांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत की गुंडीमंत्री असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली
काय आहे नेमकं प्रकरण?
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना, ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.