एसटीच्या वाहकांना आणि चालकांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशच दिलेला नसताना महामंडळ गणवेश नसणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. याशिवाय चालक-वाहकांची नियमीत मद्य तपासणीही होणार आहे. महामंडळाच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
काय आहे प्रकरण?
एसटी महामंडळाने 27 मार्च 2023 रोजी सगळया विभाग नियंत्रकांना आदेश देऊन सर्व चालक-वाहकांची नियमित गणवेश आणि मद्य तपासणीचे आदेश काढले. परंतू, एसटीकडून गेल्या तीन वर्षांपासून चालक- वाहकांना गणवेशासाठी कापड व शिलाईचे पैसे मिळाले नाहीत. उलट गणवेश सक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. आदेशात रोज चालक-वाहकांची पूर्ण गणवेशात तपासणी होणार आहे. गणवेश नसलेल्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच वाहकाला कामगिरी सोपवण्यापूर्वी त्यांची मद्य तपासणीही होणार आहे.
महामंडळाची भूमीका काय?
अनेक चालक-वाहक कर्तव्यावर असताना गणवेश घालत नाहीत तसेच काहीजण मद्यप्राशन करून गाडी चालवतात असे प्रकार उघडकीस आले आहेत असे राज्य परिवहन मंडळाने म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप
एसटीने अनेक वर्षांपासून गणवेश दिला नसताना महामंडळ कारवाईचे आदेश देते. या निर्णयाचा कर्मचाऱ्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे. चालक वाहकांच्या मद्य तपासणीवर महामंडळ आम्हाला मद्यपी समजते का असा सवाल बस कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.