• Tue. Apr 29th, 2025

गर्भवती महिला डॉ. बनली रुग्णवाहिका चालक, वाचविला तरुणाचा जीव

Byjantaadmin

Apr 3, 2023

नाशिक:-  ग्रामीण भागात तशी आरोग्य यंत्रणा कुचकीच आहे याबाबत अनेक संघटनानी तक्रारी सुद्धा केल्या आहेत. तसेच याचा आता पर्यंत अनेक नागरिकांना अनुभव सुद्धा आला आहे. कुठे डॉक्टर नसल्याने महिलेची रस्त्यात प्रसूती तर कुठ रुग्णवाहिका नसल्याने…. मात्र नाशिकच्या ग्रामीण भागात गर्भवती महिला डॉक्टर प्रियंका पवार (pregnant woman doctor)  यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत विष प्राशन केलेल्या मुलाला शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता वेळेत दाखल करून मुलाचे जीव वाचविले आहे. या डॉक्टर महिलेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोण आहेत या महिला डॉक्टर गर्भवती महिला डॉ. बनली रुग्णवाहिका चालक, वाचविला तरुणाचा जीव

प्रियंका पवार ह्या तशा बुलढाणा जिल्ह्यातील.. रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी BAMS मध्ये शिक्षण पूर्ण केल. २०१८ साली लग्न झाल्यानंतर त्यांनी नोकरीला सुरवात केली. त्यांची पहिली पोस्टिंग ऑगस्ट २०१९ ला नाशिक जिल्ह्यातील निफाड आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या म्हाळसाकोरे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यांनी म्हाळसाकोरे येथे नोकरी केली. यानंतर त्यांची बदली पेठ तालुक्यातील काहोरे येथे झाली. जानेवारी महिन्यात त्यांची म्हाळसाकोरे या आरोग्य केंद्रावर बदली करण्यात आली आहे. सध्या त्या पाच महिन्याच्या गरोदर आहेत.

नागरिकांच्या मागणीमुळे प्रियंका पवार पुन्हा म्हाळसाकोरेत 

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना डॉ. प्रियंका पवार म्हाळसाकोरे आरोग्य केंद्र येथे ड्युटीवर होत्या. कोरोना काळात त्यांनी आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली. रुग्णालयात कोणताही रुग्ण आल्यास त्याला योग्य ती मदत करणे आणि उपचार करणे यामुळे डॉ. प्रियंका ह्या गावकऱ्यांच्या अगदी जवळ आल्या होत्या. सप्टेंबर २०२१ ला त्यांची बदली पेठ तालुक्यात करण्यात आली होती. मात्र प्रियंका पवार यांची बदली  म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुन्हा करावी अशी मागणी करण्यात आल्या नंतर जानेवारी महिन्यात त्यांची बदली म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रावर करण्यात आली आहे.

नेमक काय घडल 

मांजरगाव येथील २५ वर्षीय युवकाने विष प्राशन केले होते. उपचाराकरिता या तरुणाला म्हाळसाकोरे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणण्यात आले. केंद्रात ड्युटीवर असलेल्या पाच महिन्याच्या गरोदर डॉ. प्रियंका पवार यांनी मुलावर प्राथमिक उपचार केले. मुलाच्या तब्बेतील सुधारण होत नसल्याने त्याला निफाड येथील केंद्रावर दाखल करणे गरजेचे होते. मात्र आरोग्य केंद्रावरील रुग्णवाहिकेचा चालक सुट्टीवर असल्याने आणि इतर कोणतेही  साधन उपलब्ध नसल्याने पाच महिन्याच्या गरोदर  डॉ. प्रियंका पवार यांनी मुलाला वाचविण्याचा उद्देश समोर ठेऊन रुग्णवाहिकेचे स्टेरिंग स्वतःच्या हातात घेतले आणि आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेऊन निफाडच्या दिशेने रवाना झाले. मुलाला वेळेत निफाड आरोग्य केंद्रावर उपचाराकरिता दाखल केल्याने मुलाचा जीव वाचला आहे.

मुलाच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी केले कौतुक 

शासकीय आरोग्य विभागातील डॉ. प्रियंका पवार यांच्या कार्याला गावकरी आणि पालकांनी सलाम केला असून मुलाच्या पालकांनी डॉ. प्रियंका पवार यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed