महाविकास आघाडीची भव्य सभा छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या (2 एप्रिल) रोजी पार पडणार आहे. दरम्यान या सभेवरून आता आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असणार असा, इशारा शिरसाट यांनी दिला आहे.
दरम्यान याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, ज्या मैदानात महाविकास आघाडीची सभा होता आहे, त्याच मैदानात शिवसेनाप्रमुखांना मी जवळून पाहिलं होतं. कारण त्यावेळी त्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं होतं. कुठेही जाहिरात, बॅनर नसताना लाखोंचा जनसमुदाय मैदानावर एकत्र आला होता. आता त्याच ठिकाणी महाविकास आघाडीची सभा होत असून, जेथून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा यज्ञकुंड पेटवला होता. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करण्याचं काम या सभेच्या स्टेजवर होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मध्यभागी उद्धव ठाकरे बसणार
शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत असत समाजामध्ये काँग्रेस दूरी माजवतं असून या काँग्रेसला गाडले पाहिजे. पण उद्याच्या सभेत एकीकडून काँग्रेस बसलाय आणि एकीकडून राष्ट्रवादी बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मध्यभागी उद्धव ठाकरे बसणार असल्याचे चित्र म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी आहे. याच्या यातना आम्हाला होतात. बाळासाहेबांनी जे चित्र पाहिले त्याच्या विरोधात उद्या चित्र दिसेल आणि हा अवमान नाही तर त्यांच्या विचाराला श्रद्धांजली आहे, असल्याचे शिरसाट म्हणाले.
परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार
तर उद्याची सभा म्हणजे राजकारणासाठी तुम्ही कोणत्या स्थराला गेलात याचा हा नमुना आहे. सभा कितीही मोठी झाली तरीही मला बाळासाहेबांच्या त्या सभा आठवतात. तिथे कोणी सभा घेण्याची ताकद दाखवली नाही. पण तिथे महाविकास आघाडी सांगतय की, आमची सभा मोठी होणार आहे. जे मैदान शिवसेना प्रमुखाच्या नावे होतं, आज शिवसेनाप्रमुखापेक्षा मोठी सभा घेणार आहोत असे ठाकरे गटाचे शिवसैनिक सांगतात. त्यामुळे हिंदू मतदार जो शिवसेनाप्रमुखांना मानतो तो तिथे जाणार नाही. शहरात दोन दंगली झाल्यात आजही तणावाचं वातावरण आहे. पोलिसांच्या गाड्या जाळल्यात, पेट्रोल बॉम्ब टाकून ह्या गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. असे वातावरण असताना सभा घेणे बरोबर नाही. पण विरोध केला तर हे लोकशाहीचा गळा घोटला असं म्हणतात. या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, असतील असेही शिरसाट म्हणाले.