छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी 15 अटी घातल्यात. येत्या 2 एप्रिल रोजी ही सभा होत आहे.
रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर या सभेला परवानगी मिळणार की नाही, याची चर्चा होती.
सभेची तयारी पूर्ण
छत्रपती संभाजीनगरातून महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांचा प्रारंभ २ एप्रिलपासून केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूर, 1 मे रोजी मुंबई, 14 मे रोजी पुणे, 28 मे रोजी कोल्हापूर, 3 जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी मराठा सांस्कृतिक मंडळावर ही सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
सभेला घातलेल्या अटी
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यात काही अटी घातल्या आहेत. ही सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत बदल करू नये. सभेसाठी येणाऱ्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये. सभेला येताना शस्त्र बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
परवानगी मिळू नये म्हणून…
छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून दंगल घडवण्यात आली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, कायदा व्यवस्थेचे कारण पुढे करत सभेला परवानगी मिळू नये हे या दंगलीमागचे कटकारस्थान आहे. यापूर्वी कधी रामनवमीत हल्ले झाले नव्हते. महाराष्ट्रात आमचे सरकार असताना दंगली झाल्या नाहीत. गुजरात, महाराष्ट्र याठिकाणी त्यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा दंगे झाले नाहीत. तुमच्याच राज्यात असे का होत आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.