विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अस्थिव्यंग विभागाने सांध्याची अवघड शस्त्रक्रिया केली यशस्वी ..!
जिल्ह्यातील नागरिकांनी अस्थिव्यंगावर मात करण्यासाठी लाभ घ्याव–अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख
लातूर, दि.10(जिमाका):- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभागाने आता अत्यंत अवघड व गुंतागुंतीच्या समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया आता या रुग्णालयात सहज शक्य होवू लागल्या आहेत. अलिकडेच कंबरेतील खुबा बदलण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
वय 73 वर्षीय मोतीराम राठोड, दोन्ही कंबरेच्या सांधेदुखीणे त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही कंबरेच्या खुब्याची झिज होऊन सांधे कमजोर व निकामी झाले होते (AVN),त्यासाठी बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेतले, सर्व डॉक्टरांनी यावर अंतिम उपचार हा शस्त्रक्रियाच आहे असे सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी भरपूर खर्च अपेक्षित असेल असेही सांगितले.
मोतीराम राठोड यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून मग त्यांनी शेवट विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. रणजीत हाकेपाटील यांच्या सल्ला घेत याच रुग्णालयात कंबरेतील खुब्याचे प्रत्यारोपणाची (THR)अवघड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकारची शस्त्रक्रिया विलास देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये तुरळक होतात . डॉ.सुधीर देशमुख, अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. रणजीत हाके पाटील ,अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख व इतर पथक प्रमुख डॉ.शशिकांत कुकाले, डॉ. प्रशांत घुले व इतर सहायक डॉक्टर डॉ.विजय वाघमारे, भुलतज्ञ डॉ. शैलेन्द्र चौहान डॉ. मोरे व परिचारिका यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या डाव्या खुब्याची शस्त्रक्रिया पार पाडली. अश्या प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयात होत आहेत तरी अश्या प्रकारच्या संपूर्ण खुबा बदलीच्या (Total Hip Replacement) शस्त्रक्रियाचा लाभ लातूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी केले.