लातूर जिल्हा क्रीडा संकुलातील कुस्तीपटू बनला ‘कुमार महाराष्ट्र केसरी’
- कुस्तीपटू सोनबा लवटे याला मानाची चांदीची गदा
लातूर(जिमाका): जिल्हा क्रीडा संकुल येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये कुस्तीचा सराव करणारा सोनबा लवटे याने इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये 110 किलो वजन गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविला. त्यामुळे त्याला मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली.कुस्तीपटू सोनबा लवटे याला जिल्हा क्रीडा संकुलातील सुरेंद्र कराड, चेतन जावळे, संतोष इगवे यांनी प्रशिक्षण दिले. ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे 26 मार्च रोजी इचलकरंजी येथे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यात सोनबा लवटे याने पै. आर्यन पाटील याला 01-08 या गुण फरकाने पराभूत करून विजय मिळवला.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते सन्मान
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यानंतर सोनबा लवटे याचे लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यांनी अभिनंदन केले. तसेच भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन शाखा श्री. कोकरे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, संतोष इगवे, चेतन जावळे, महेंद्र बनसोडे यावेळी उपस्थित होते.