छत्रपती संभाजीनगर, : रमजानच्या पवित्र महिन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. याकाळात मुस्लिम समुदाय कडक उपवास पाळतात. याच उपवासासाठी छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात रमजान महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात पेंड खजूर उपलब्ध झाले आहेत. शहरातील प्रत्येक चौकामध्ये पेंड खजूरची विक्री होत असल्याचे बघायला मिळत आहेत. बाजारात पेंड खजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यांच्या किंमती मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत.
का झाली भाववाढ?
मुस्लिम बांधवांचा रमजान हा उपवासाचा महिना असतो या पवित्र महिन्यामध्ये लहानांपासून मोठ्या व्यक्ती उपवास ठेवत असतात. मुस्लिम बांधव दिवसभर उपवास ठेवून सायंकाळच्या वेळी पेंड खजूरने रोजा सोडत असतात. यामुळे आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये पेंड खजूर हे असतातच आणि यामुळेच रमजान महिन्यांमध्ये पेंड खजूरला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा डॉलरचे दर वाढल्याने तसेच टॅक्स लागल्यामुळे याचा परिणाम शहरातील विक्रीसाठी आलेल्या पेंड खजुराच्या किंमतीमध्ये बघायला मिळत आहेत.
ग्राहकांना झळ
यावर्षी 120 रुपयांपासून ते 1800 रुपये किलोपर्यंत पेंड खजूर बाजरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पेंड खजुरीच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे याची झळ ग्राहकांना बसत आहे. ‘बाजारामध्ये देशी विदेशी खजूर आहेत. बाजारामध्ये मेडजोल, आस्वादी, नागरी, अल्जेरिया आणि आजवा असेही खजूर उपलब्ध आहेत. यात कच्ची पक्की, मरियम, गुलाब जामुन, सुलतान, अल्जेरिया, सुकरी आस्वादी आणि रुबी या नावाच्या खजुरांची किंमत 280 ते 350 किलो प्रमाणे आहे’, असं पेंड खजूर विक्रेते श्रीकांत राजलवार यांनी सांगितले.
खजुरांच्या किंमतीमध्ये भाववाढ
त्यासोबतच मरियम गोल्ड, कलमी, मेडजोल या खजुरांची किंमत 600ते 1000 रुपयांपर्यंत आहे. त्यासोबतच टेरको, मरियम या पेंड खजुराची गेल्या वर्षी 110 रुपये किंमत होती यंदा यावर्षी ही किंमत 250 ते 280 रुपये प्रमाणे आहे. इराणी चटई खजूरचे दर गेल्या वर्षी 220 ते 230 पर्यंत होते. मात्र आता या खजूरचे दर 260 ते 270 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. यासोबतच प्रत्येक खजूरच्या किंमतीमध्ये याचप्रमाणे भाववाढ बघायला मिळत आहे.
विविध खजुरांचा समावेश
यावर्षी बाजारामध्ये आलेल्या पेंड खजुरामध्ये मरियम, टेरको, इराणी यासोबतच खजुरांसोबत मदने, मदनी मगरूर, मदनी मशरूम,मदनी सुखरी, जैस्वा खजूर, रब्बी खजूर, माबरून खजूर इत्यादी विदेशी खजूर आहेत. तर भारतीय खजुरांमध्ये कच्ची पक्की, सुकरी, गुलाब जामुन नावाच्या विविध खजुरांचा समावेश आहे.
रमजान महिन्यांमध्ये प्रत्येक मुस्लिम बांधव दर्जेदार साहित्य खरेदी करत असतो. यामुळे यापूर्वी महागडे खजूर खरेदी करण्यावरती ग्राहक प्राधान्य देत होता. मात्र यावर्षी वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांना हे परवडत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक महागाडी खजूर खरेदी करण्यापेक्षा कमी किंमती मिळणारे खजूर खरेदी करत आहेत, असंही विक्रेते श्रीकांत राचलवार यांनी सांगितले.
पेंड खजुराच्या होलसेल किंमती खालील प्रमाणे
मरियम 280 रुपये किलो, इराणी खजूर 95 रुपये किलो, यासोबतच खजुरांसोबत मदनी मगरूम 600 रुपये किलो, अजवा खजूर 1200-1400 रुपये किलो, इराणी 100-120 रुपये किलो, किमिया अर्धा किलो 140-150,अल्जेरिया कच्ची पक्की 400 रुपये किलो, सूखरी 700 रुपये किलो इत्यादी.