• Wed. Apr 30th, 2025

स्वतःच्या पलीकडे पाहण्याची माणसाची दृष्टीच थांबलीय : प्रा. महेश एलकुंचवार

Byjantaadmin

Mar 27, 2023
स्वतःच्या पलीकडे पाहण्याची माणसाची दृष्टीच थांबलीय : प्रा. महेश एलकुंचवार
 —————————–—————————————————–
अतुल देऊळगावकर लिखित ‘ निसर्गकल्लोळ – मानवी अविवेकाचे अंतरंग ‘  पुस्तकाचे  थाटात प्रकाशन
————————————————————————————————————
 लातूर : सद्यस्थितीत माणूस उद्याचा दिवस उगवणारच  नाही, असे समजून वागताना दिसतोय. स्वतःच्या पलीकडे बघण्याची त्याची दृष्टीच थांबलीय. जीवन ही एक घटना आहे आणि घटनेला स्वतःचा स्वभाव नसतो. परस्परांबद्दल आंतरिक जिव्हाळा असेल तरच घटना अनुभवात  परावर्तित होत असते,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. महेश एलकुंचवार यांनी केले.
                                   स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने रविवारी सायंकाळी  श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या  ‘ कंचन – कस्तुर ‘ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुक्तसंवाद कार्यक्रमात  ज्येष्ठ साहित्यिक प्रा. महेश एलकुंचवार आपले विचार व्यक्त करीत होते.
यावेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ  पत्रकार – पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर लिखित ‘ निसर्गकल्लोळ – मानवी अविवेकाचे अंतरंग ‘ ह्या पुस्तकाचे प्रकाशन  करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष  श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप,  डॉ.अजित जगताप ,  ‘राजहंस प्रकाशना’चे  दिलीप माजगावकर यांसह  अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रा. महेश एलकुंचवार यांनी मानवी स्वभावाचे विविध पैलू अत्यंत  प्रभावीपणे उलगडले. पूर्वी झाडावर घाव घातला की, शेतकरी कळवळत असत. आता सहजपणाने झाडे तोडली जात असल्याचे पाहावयास मिळते. ग्रामीण भागातील माणसांची आता निसर्गाकडे बघण्याची कल्पनाच बदलली आहे. काही वर्षांपूर्वी आम्हाला वास्तवात जगण्याची सवय होती. त्याकाळी जंगलेही  मोठ्या प्रमाणात होती. आता जंगल  ही संकल्पनाच कालबाह्य होत चालल्याचे दिसत आहे. ज्या जंगलातुन जाताना दिवसासुध्दा बैल थबकायचे, आता अशी घनदाट जंगले पाहायला मिळत नाहीत. माणसाचे जगणे आत्मकेंद्रित होत गेल्याने जंगले संपत गेल्याचे एलकुंचवार म्हणाले.
कोणतीही गोष्ट इतरांना सांगण्यापूर्वी स्वतः त्याचे अनुकरण , आत्मचिंतन करणे आवश्यक असते. स्वतःच्या खाजगी विषयावर बोललेले कोणालाही आवडत नाही. परस्परांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची तयारी असणे खूप महत्वाचे असते. जीवनात व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा जिव्हाळ्याची माणसे  सोबत असणे  अत्यंत आवश्यक असते. भौतिकवादाच्या नावाखाली माणूस आदिवासींपेक्षाही अधिक क्रूर होत गेल्याचे एलकुंचवार यांनी सांगितले. आदिवासी शिकारीपुरते प्राणी मारत असत तर माणूस खेळ म्हणून मारत असल्याचे ते म्हणाले. मनुष्य  स्वतःला तपासून पाहत नाही तर इतरांना आधी तपासतो. ही वृत्ती अत्यंत चुकीची आहे. समाजात वावरणाऱ्या सगळ्यांनीच चुका करायच्या नाहीत असे ठरवले तरच समाज सुखी होऊ शकेल. त्याकरिता माणसाच्या मनातली सगळी अडगळ  संपली पाहिजे. पर्यावरणाचा वाढत असमतोल दूर करण्यासाठी शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना झाडांचे महत्व पटवून दिले पाहिजे. त्यांना झाडे लावण्यास प्रेरित केले पाहिजे तरच त्यांना वृक्षाबद्दल प्रेम, जिव्हाळा वाटेल आणि जंगले वाढण्यास मदत होईल,असेही प्रा. एलकुंचवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कलाविश्वाबद्दलही अत्यंत मौलिक विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक अतुल देऊळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिजित जोंधळे यांनी केले. यावेळी  डॉ.  एड. मनोहरराव गोमारे, चेतन सारडा, कमलकिशोर अग्रवाल,  प्राचार्य  डॉ. नागोराव कुंभार, डॉ. सोमनाथ रोडे,  अतुल उपाध्याय, शेखर देशमुख, प्रसाद कुमठेकर, डॉ. ईश्वर देऊळगावकर, नितीन सावरीकर  यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed