एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे महिलावर्गात आनंद असताना आता या आनंदात आणखी भर पडली आहे.
आजपासून अंमलबजावणी
एसटीपाठोपाठ आता चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशननेही आपल्या खासगी बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे आज गुढीपाडव्याच्या शूभमुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केल्याचे असोसिएशनमधील ट्रॅव्हल्स मालकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे एसटीच्या सवलतीमुळे आनंदलेल्या महिला प्रवाशांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. या ट्रॅव्हल्सने ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे.
राज्यात पॅटर्न लागू होण्याची शक्यता
विशेष म्हणजे संपूर्ण राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स असा निर्णय घेऊ शकतात. हा पॅटर्न संपूर्ण राज्यातही लागू होऊ शकतो. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशाही चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत
राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती. यात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. महिलांच्या सन्मानासाठी ही योजना जाहीर केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने स्वागत केले आहे.
महिलांच्या सन्मानासाठी घेतला निर्णय
चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल म्हणाले की, खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. सरकारप्रमाणेच महिलांच्या सन्मानासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल महिला प्रवाशांनीही आनंद व्यक्त केला आहे. ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे महागाईचा भार कमी होईल, अशा भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.