• Thu. Aug 14th, 2025

नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून लवकरच भरपाईची घोषणा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Byjantaadmin

Mar 22, 2023

धुळे,  : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिला.

धुळे तालुक्यातील आनंदखेडे, साक्री तालुक्यातील काळटेक, सिरबेन,  शिंदखेडा तालुक्यातील बेटावर या गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त भागातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसिलदार गायत्री सैंदाणे, सतिश महाले यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, कांदा, मका, गहू, बाजरी, पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात १२ हजार कोटींची सर्वाधिक मदत

गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली नाही. यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज

यावेळीच्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरूवातीला १३ हजार हेक्टर, नंतर ४० हजार हेक्टर व आताच्या क्षणाला सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनात असूनही कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे

धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाच्या आंदोलन काळातही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असल्याची सकारात्मक बाब खुद्द शेतकऱ्यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगून शेतकऱ्यांप्रती सर्वांच्या भावना संवेदनशील असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांचे कौतुकही यावेळी कृषी मंत्र्यांनी केले.

अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार

धुळ्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनीही यापूर्वीच नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन जिल्हा प्रशासनाशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची घोषणा करणार आहेत, असेही कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जावून पाहणी

आनंदखेडे, काळटेक, सिरबेन, बेटावर आदि ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवसभर कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *