• Fri. Aug 15th, 2025

प्रवाशांचा मोठा दिलासा; एसटीचा प्रवास आता होणार आरामदायी, हिरकणी, रातराणी पुन्हा धावणार

Byjantaadmin

Mar 19, 2023

मुंबईः सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या इतिहासात लाल परीमध्ये प्रथमच आरामदायी (पुशबॅक) आसने बसवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे, हिरकणी आणि रातराणी ही प्रतिष्ठित सेवा पुन्हा एकदा रस्त्यावर आणण्यासाठी गाड्यांची वेगाने बांधणी होत आहे.

दापोडीस्थित एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत ४५० लाल परी (साधी), २०० हिरकणी (निमआराम) आणि ५० रातराणी (शयनयान) अशा एकूण ७०० बस गाड्यांची बांधणी करण्यात येत आहे. या गाड्यांसाठीच्या चेसिस कार्यशाळेत उपलब्ध झालेल्या आहेत. साध्या गाड्यापैकी १५० गाड्या संबंधित विभागांना रवाना करण्यात आल्या आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्व गाड्यामध्ये आरामदायी आसने असणार असून जूनअखेर या सर्व गाड्या प्रवासी सेवेत दाखल होतील, असे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध, शिवाई या गाड्यांमध्ये आरामदायी आसने आहेत. साध्या दरात आरामदायी प्रवासासाठी ही आसनव्यवस्था साध्या गाडीतदेखील बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजनेनंतर राज्यात लाल परीसाठी मोठी प्रवासी मागणी आहे. यामुळे तातडीने लाल परी प्रवासीसेवेत दाखल करण्यात येणार आहेत. कार्यशाळेत बांधण्यात येणाऱ्या गाड्या वगळता अन्य दोन हजार साध्या गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. स्वमालकीच्या असलेल्या या बसगाड्या येत्या वर्षभरात ताफ्यात दाखल होतील, असे ही चन्ने यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपादरम्यान कंत्राटी पद्धतीने बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची अंमलबजावणी आता होत असून भाडेतत्त्वावरील ५०० साध्या बस गाड्या महामंडळात येणार आहेत. यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यांनी लातूरसाठी ६०, कोल्हापूरसाठी ६० आणि रायगड आणि रत्नागिरीसाठी प्रत्येकी ५० बस गाड्या दिलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यासाठी ८० तर, सांगलीसाठी १०० गाड्या कंत्राटदाराकडून पुरवण्यात येणार असून उर्वरीत १०० गाड्या लवकरच महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहे, अशी माहिती महामंडळाने दिली

दापोडीस्थित एसटी कार्यशाळेत दिवसाला दोन गाड्यांची बांधणी होते. खासगी कंपन्यांमध्ये दिवसाला पाच ते सहा गाड्यांची बांधणी पूर्ण होते. यामुळे दापोडीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील धीम्या गतीने होणाऱ्या बस बांधणीमुळे जून अखेर रातराणी, हिरकणी, लालपरी या बसगाड्या प्रवासी सेवेत दाखल होतील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

– रीडिंग लॅम्प आणि चार्जिंग सॉकेटची सुविधा असलेली तयार हॅटरॅक

– आरामदायी आसनांसह मॅगझिन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर आणि बॅग हूक

– राखीव टायर ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था

– आतील बाजूस उघडणारे दरवाजे

 

रातराणीसाठी विशेष दर

महामंडळात सध्या बैठे आसन आणि शयनयान या दोन्ही व्यवस्था असलेल्या गाड्या आहेत. पूर्ण शयनयान श्रेणीतील विना वातानुकूलित बस बांधणी महामंडळात प्रथमच होणार असून त्यात ३० आसने असतील. यामुळे रातराणी ही सेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या बसमधून प्रवास करण्यासाठी विशेष दर आकारला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *