• Fri. Aug 15th, 2025

सरपंचांच्या सहकार्याने कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पौष्टिक तृणधान्य अभियान यशस्वी होईल – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Byjantaadmin

Mar 19, 2023
बीड,  :- आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अभियान 2023 राबविण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्याचा समाजाच्या सर्व स्तरात आहारात वापर वाढताना पौष्टिक तृणधान्याला बाजारपेठ मिळावी यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना देखील सदर तृणधान्य पीकं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्याची व त्यातून उत्पन्न वाढवण्याची संधी आहे.  सरपंचांच्या सहकार्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ज्वारी, बाजरी, वरई, नाचणी, राजगिरा अशा तृणधान्य  पीक उत्पादनासाठी प्रोत्साहित करावे यातून अभियान यशस्वी होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य योजने अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा व सरपंच परिषदेचे उद्घाटन कृषिमंत्री श्री सत्तार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेसाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी कुंडलिक खांडे, श्री.चंद्रकांत नवले, जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच आणि कृषी क्षेत्रातील व्यक्ती, विविध विभागांचे अधिकारी यांची  प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीस महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या बीड जिल्ह्यातील महिला सरपंच शेख मुन्नाबी मुजफ्फर पटेल यांचा आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित झालेले बीड गटविकास अधिकारी श्री सानप, तालुका कृषी अधिकारी श्री गंडे आदींचा सत्कार कृषी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे सूरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे प्रसारण सभागृहातील स्क्रीनवर करण्यात आले.
नंतर कृषिमंत्री श्री सत्तार यांनी उपस्थित सरपंचानी तृणधान्य अभियानाबाबत आपल्या संकल्पना मांडाव्यात, असे आवाहन केले. यावेळी वंजारवाडी गावचे सरपंच वैजनाथ भगवान तांदळे, ताडसोन्नाचे बाळासाहेब नागटिळक, खडकी चे संतोष थोरात , पंजाबराव चौरे यासह  शेतकरींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माहिती देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अभियानची सुरुवात एक जानेवारी रोजी झाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या अभियानाचे अंमलबजावणी होण्यात भारताचा मोठा वाटा आहे. या अभियानाअंतर्गत सरपंच परिषद व कार्यशाळा घेणारा बीड हा पहिला जिल्हा आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे कार्यशाळा होत आहे यातून ते देशभरातील साडेसात लाख शेतकऱ्यांशी संवाद साधून पौष्टिक तृणधान्य अभियानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी बीड येथे होणारी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरत आहे.
 अन्नधान्याचे कमतरता असल्याने पूर्वी रासायनिक खतांचा वापर झाला व उत्पादनात क्रांती झाली पण याचा काही दुष्परिणाम देखील समोर येऊ लागला आहे. पंजाब हरियाणा राज्यातून दिल्ली येथे जाणारी कॅन्सर एक्सप्रेस चिंतेची बाब आहे.  लोकांमधील आजारांचे प्रमाण कमी होण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढणे गरजेचे दिसून येत आहे 75 लाख हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याचे उत्पादन घेण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले आहे असे मार्गदर्शन कृषिमंत्री श्री सत्तार यांनी केले
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे म्हणाल्या , पौष्टिक  तृणधान्याचा आहार कमी असल्यामुळे कर्करोग, स्थूलपणा आदी आजारांचे प्रमाण वाढते आहे . ते रोखण्यासाठी तृणधान्याचा वापर आहारात वाढणे गरजेचे आहे. विविध योजनांच्या अंमलबजावणीतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील असून कृषिमंत्री महोदय यांच्या प्रोत्साहनमुळे या कामा गती येईल असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, तृणधान्य आधारित पदार्थ विक्री मुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीची संधी असून जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये त्यांना यासाठी स्टॉल व कॅन्टीन सुरू करण्याबाबत सुविधा देण्यात येतील . बाजरी या धान्याच्या राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणास देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी असून निर्यात करण्याकडे कल वाढत आहेत.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित सरपंच आणि शेतकरी यांचे समवेत मुक्त संवाद साधला सरपंचांच्या सूचना ऐकून घेतल्या तर त्यांच्या भाषणादरम्यान शेतकरी व उपस्थितांकडून लेखी चिठ्यांद्वारे मांडण्यात येत असलेल्या अडचणी प्रश्न व मुद्द्यांचा अनुषंगाने सरकारी पातळीवर होत असलेली कार्यवाही व योजनांच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले संधी आदींची माहिती दिली .महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या संबंधित शासनाने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णय व योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मान्यतेसाठी सादर असून त्याची घोषणा केली जाईल असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये पिक विमा , राज्य सरकारने  देखील शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये सन्माननिधी देण्याचा निर्णय म्हणजे केंद्राच्या योजनेसह  एकून 12 हजार रुपये मिळतील , जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य शासकीय कर्मचारी संघटनांचा संप,राज्याची आर्थिक स्थिती, शेतकरी अपघात विमा योजने बाबत असलेल्या अडचणी दूर करून तातडीने दोन लाखापर्यंत मदतसाठीचा निर्णय, शेतकरी जोडधंदा देशी गाई साठी मदत असे विविध बाबींच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *