छगन भुजबळांच्या विमानातून मंत्री गिरीश महाजन लातुरात …
पाहणी दौरा असल्याने ऐनवेळी एक जागा केली रिकामी
लातूर : गारपिटीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी तातडीने लातूर व नांदेड दौऱ्यावर यायचे होते. दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी लातूरला येणार असल्याचे कळल्यावर मंत्री महाजनही त्याच विमानाने आले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने एकमेका साह्य करू…अशी चर्चा सकारात्मकपणे रंगली.
गारपिटीने लातूर जिल्ह्यात अनेक गावांत अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पालकमंत्री महाजन म्हणाले, नांदेड दौरा नियोजित होता. तसेच लातूरला नुकसानीची पाहणी करण्यासाठी यायचे होते. तातडीने विमान मिळेल का याचा शोध सुरू होता. परंतु, ते उपलब्ध झाले नाही. दरम्यान, लातुरात संविधान स्तंभ लोकार्पण सोहळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जाणार असल्याचे कळले. त्यांना संपर्क केल्यावर भुजबळ यांनी एक सहकारी कमी करून मला सोबत आणले. त्यांच्यामुळेच लातूर दौरा झाला, असेही महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.