लातूर : सकाळच्या सुमारास प्रवासी घेऊन लातूरला निघालेल्या काळी पिवळी आणि दुधाच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून ९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात लातूर नांदेड मार्गावरील चाकुर तालुक्यातील महाळंग्रा येथे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.
चाकूर – लातूर रोडमार्गे प्रवासी घेऊन काळी पिवळी जीप लातूरच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, महाळंग्रा येथे प्रवाशांसाठी काळी पिवळी रस्त्याच्या कडेला थांबली होती. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील दुधाच्या मिनी टेम्पोने काळी पिवळी जीपला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या दुधाच्या वाहनासह काळी पिवळी जीप रस्त्याच्या खाली गेली. या भीषण अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महाळंग्रा गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी अपघाताबाबत माहिती दिली. तसेच रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. जखमींना लातूर येथे दिवंगत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत.