• Fri. May 9th, 2025

लातूर जिल्ह्यातील 54 हजार 205 शेतकरी कुटुंबांना आता अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम

Byjantaadmin

Mar 18, 2023

लातूर जिल्ह्यातील 54 हजार 205 शेतकरी कुटुंबांना

आता अन्नधान्याऐवजी मिळणार रोख रक्कम

  • डीबीटीद्वारे रक्कम होणार बँक खात्यात जमा

लातूर,  (जिमाका) : राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दरमहिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य देण्यात येत होते. यामध्ये गहू प्रतिकिलो दोन रुपये आणि तांदूळ प्रतिकिलो तीन रुपये दराने मिळत होता. या योजनेंतर्गत यापुढे दरवर्षी अन्नधान्याऐवजी प्रतिलाभार्थी एक हजार 800 रुपये इतकी रोख रक्कम डीबीटीद्वारे देण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील 54 हजार 205 शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना तांदूळ तीन रुपये व गहू दोन रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. लातूर जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे. आता या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी कुटुंबातील प्रतिलाभार्थी, प्रतिवर्षी एक हजार 800 रुपये प्रमाणे रक्कम थेट दरमहा बँक खात्यात वितरीत केली जाणार आहे.

जिल्ह्यात केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब संख्या 54 हजार 205 इतकी आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील 5 हजार 983, औसा तालुक्यातील 9 हजार 354, चाकूर तालुक्यातील 5 हजार 406, देवणी तालुक्यातील 2 हजार 727, जळकोट तालुक्यातील एक हजार 730, लातूर तालुक्यातील 6 हजार 744, निलंगा तालुक्यातील 10 हजार 938, रेणापूर तालुक्यातील 5 हजार 556, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 2 हजार 921 आणि उदगीर तालुक्यातील 2 हजार 846 शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जवळपास 2 लक्ष 55 हजार व्यक्तींच्या खात्यावर या योजनेतून रोख रक्कम जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *