मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत बुधवार-गुरुवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. अनेक जिल्ह्यांत गारपिटीमुळे शेतमालासह मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मराठवाडा आणि खान्देशात अवकाळीशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू झाला.
मराठवाड्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, लोहा, मुदखेड तालुक्यातील काही गावांसह अनेक भागांत गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. बारड (ता. मुदखेड) येथील महामार्ग पोलिस ठाण्यावरील पत्रे उडून गेले. याच गावात घर कोसळून शिवाजी दत्ता गजभारे (३५) यांचा मृत्यू झाला. नाव्हा (ता. हदगाव) येथे वीज पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला. लोहा तालुक्यात एक बैल, मुखेडमध्ये एक शेळी दगावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठणसह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी काेसळल्या. पावसामुळे तापमानात सरासरी ४ ते ५ अंशांची घट झाली.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला बसला तडाखा
गुरुवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे द्राक्ष, गहू, हरभरा, बटाटा, कांद्याचे नुकसान झाले. खान्देशात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी लागली. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे झाडाची फांदी पडून सागर संजय धनगर (३३) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्यातही पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
विदर्भातही हजेरी; गहू, हरभऱ्याचे नुकसान
विदर्भात गुरुवारी दुपारी तसेच बुधवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात काही भागात आलेल्या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले. विक्रीसाठी बाजार समितीत आलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली. नागपूर बाजार समितीत संत्रा पिकाचेही नुकसान झाले. अकाेला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर बुलडाणा, यवतमाळमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
मंगळवारपासून वातावरण निवळणार
पुण्यासह सातारा, सांगली, काेल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पुढील ३ दिवस गडगडाटी वादळासह पाऊस पडणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली. मंगळवारपासून (२१ मार्च) वातावरण निवळणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.