जिल्हा परिषदेच्या देवगाव गटात दहा हजाराहून अधिक मताधिक्याचा विक्रम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता पवार आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. पवार यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी प्रदिर्घ काळ एकनीष्ठ असलेल्या पवार कुटूबातील अमृता पवार यांचा भाजप प्रवेश अनेकांना धक्कादायक ठरला आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला कंटाळून हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य पवार यांनी समर्थकांच्या आग्रहातून हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. आर्कीटेक्ट अमृता पवार या देवगाव (निफाड) जिल्हा परिषदेच्या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या होत्या. त्यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक दहा हजारांचे मताधिक्य मिळवल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय प्रवेशाने आगामी निवडणुकीत निफाड विधानसभा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात नवे समिकरण तयार होण्याची शक्यता आहे. देवगाव जिल्हा परिषद गट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात समाविष्ट आहे. स्थानिक स्तरावरील विविध राजकीय कार्यक्रम तसेच गटातील विकासकामाच्या श्रेयवादातून येथे मतभेद निर्माण झाले होते. स्थानिक नेत्यांकडून सातत्याने उपेक्षा केली जात होती. त्याला कंटाळूनच हा प्रवेश झाल्याचे कळते.
आर्की. पवार या गोदावरी नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार (कै) वसंतराव पवार आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस निलीमाताई पवार यांच्या त्या कन्या आहेत. तळागाळात संपर्क असलेल्या कल्पक कार्यकर्त्या म्हणून त्या परिचीत आहेत.