पुणे : राहुल कुल भाजपचे आमदार असले म्हणून काय झालं, त्यांना काय भ्रष्टाचार करायचं लायसन्स दिलं आहे का? वास्तविक देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांची सहकारी साखर कारखाना वाचविण्याची नैतिक जबाबदारी मोठी आहे. आमदार कुल यांना भारतीय जनता पक्षाने निलंबित करावे आणि चौकशी करून त्यांनी हडपलेला पैसा वसूल करावा, अशी भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी केली आहे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या विरोधात ५०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केल्यानंतर कुलांचे पारंपारिक विरोधक नामदेव ताकवणे आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आमदार राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी आपण पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजप नेत्यानेच आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या निलंबनाची मागणी केल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
ताकवणे म्हणाले की, भीमा कारखान्यासंदर्भात मी गेली दोन वर्षांपासून लढा उभा केला आहे. बॅंकेने जेव्हा सरफेशी अंतर्गत कारवाई सुरू केली, तेव्हा संचालक मंडळाने हरकत घेऊन न्यायालयात जायला पाहिजे होते. पण दुर्दैवाने संचालक मंडळ न्यायालयात गेलं नाही. मी सभासद आणि माजी संचालक या नात्याने सरफेशी कायद्याविरोधात डीआरटी न्यायालयात धाव घेतली. गेली एक वर्षभर मी त्या कारवाईला स्थगिती मिळविली आहे. राज्य सहकारी बॅंकेने ३२ कोटींसाठी कारखान्यावर कारवाई केली. वास्तविक ३२ कोटींची साखर कारखान्यावर पडून होती. ती साखर विकून राज्य सहाकरी बॅंकेने आपले पैसे वसूल करावेत. त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १५० कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे. त्या दीडशे कोटींसाठी १२८ कोटी रुपये अनामत स्वरूपात कारखान्याने जे काढले आहेत. ते वसूल करावेत आणि पुणे जिल्हा बॅंकेचे पैसे फेडावेत. जेणेकरून कायद्याच्या कचाट्यातून भीमा-पाटस कारखाना बाहेर येईल आणि ४९ हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना वाचेल. त्यासाठी मी न्यायालयीन संघर्ष करीत आहे, तो पुढेही चालू ठेवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांच्या आरोपानंतर हा विषय राज्यपातळीवर चर्चिला गेल्यानंतर अनेकांनी मला फोन करून विचारले की, भाजपचा आमदार आणि त्यांच्याविरोधात तुम्ही भाजपचे पदाधिकारी कसं काय बोलू शकता? पण, ही तर खरी लोकशाही आहे. भाजपचा आमदार असला म्हणून काय झालं, त्याला काय भ्रष्टाचार करायचं लायसन्स दिलं आहे का? वास्तविक देशात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना भाजप आमदाराची सहकारी साखर कारखाना वाचविण्याची नैतिक जबाबदारी मोठी आहे. त्यांनी कसोशीने प्रयत्न करायला पाहिजे होते, पण केले नाहीत, असा आरोपही नामेदव ताकवणे यांनी केला.
दरम्यान, राहुल कुले हे गेली २० वर्षे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दुर्दैवाने त्यांनी कारखाना वाचविण्यामध्ये योगदान न देता, कारखाना लुटण्यामध्ये योगदान दिले आहे. पाचशे कोटींची आर्थिक उलाढाल असलेली कारखान्याची सर्वसाधारण सभा अवघ्या अडीच ते तीन मिनिटांत त्यांनी संपवली. स्वतः मात्र प्रास्तविक दीड दीड तास केले, अशा या राहुल कुल यांना भाजपने आमदारकीतून निलंबित करावे. निलंबनानंतर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांनी हडपलेले पैसे वसूल करावेत आणि बॅंकांच्या कचाट्यातून हा भीमा-पाटस साखर कारखाना वाचवावा, अशी मागणीही ताकणवणे यांनी केली.